Jamkhed Truck Robbery Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Truck Robbery: जामखेडमध्ये ट्रकचालकाला मारहाण करून लूट; 12 तासांत तिघे जेरबंद

दुचाकी आडवी लावून हल्ला; पोलिसांची जलद कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जामखेड शहर: पुणे येथून कोंबडीचे खत घेऊन माजलगावकडे जात असताना जामखेड-साकत रोडवर सावरगावजवळ ट्रकचालकास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली. यानंतर ट्रकच्या काचा फोडून व ट्रकचालकास मारहाण करून लूटमार केली. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या बारा तासांतच अटक केली आहे.

या प्रकरणी शुभम सूर्यभान चव्हाण, शुभम ज्ञानोबा चव्हाण व राम अशोक अडाले व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. सावरगाव, ता. जामखेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 30 रोजी फिर्यादी संतोष बिभीषण फरताडे (चालक, रा. सोमनाथवाडी, जि. बीड) व बाळू श्यामराव तांबे (रा. परांडा, जि. धाराशिव) हे दोघे ट्रक (एमएच 14 एल एक्स 9969) मधून पुणे येथून माजलगाव या ठिकाणी कोंबडीचे खत घेऊन चालले होते.

दि. 31 रोजी रात्री त्यांचा ट्रक हा जामखेड साकत रोडवरून चालला होता. गतिरोधक आल्याने ट्रकचालकाने वेग कमी केला. त्यानंतर तीन आरोपींनी ट्रकला दुचाकी आडवी लावून ट्रकच्या काचा फोडल्या, तसेच ट्रकमधील दोघांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवून बळजबरीने खिशातील रोख रक्कम व गाडीतील साहित्य घेऊन फरार झाले.

ही घटना जामखेड पोलिसांना समजताच पोलिस पथकातील पो. ना. रविंद्र वाघ, पो. कॉ. देविदास पळसे, कुलदिप घोळवे व आकाश शेवाळे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी व परिसरात रवाना झाले. तपास करत असताना पोलिसांना हे आरोपी सावरगाव येथील असल्याचे समजले.

आरोपी शुभम सुर्यभान चव्हाण व राम अशोक अडाले यांना पोलिसांनी सोनेगाव परिसरातून, तर शुभम ज्ञानोबा चव्हाण यास सावरगाव डोंगर भागातून ताब्यात घेतले.ही कारवाई पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई किशोर गावडे, पोसई पुष्कर कडू, पो. ना. रविंद्र वाघ, पो.कॉ. देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, भागीरथ देशमाने, दत्तू बेलेकर, इश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदीप चव्हाण, गणेश गायकवाड, दिंगाबर औचारे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT