Jamkhed Robbery Gang Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Robbery Gang: जामखेडमध्ये दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश; पाच जण ताब्यात, आठ घरफोडींची उकल

नान्नजमधील दरोड्याचा तपासातून धक्कादायक माहिती समोर; महिलेच्या नियोजनाचा पोलिसांचा दावा, लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील घरात घुसून चाकू व कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दरोड्याचे नियोजन एका महिलेने केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान, याच टोळीने जामखेड तालुक्यातील विविध गावांत केलेल्या आठ घरफोडीच्या गुन्ह्यांचीही उकल झाली आहे.

नाना्न ता. जामखेड येथील मनिषा श्रीमंत गोरे यांच्या घरात २ ऑक्टोबर रोजी रात्री दोनच्या सुमारास अनोळखी आरोपींनी प्रवेश केला. चाकू व कोयत्याचा धाक दाखवून गोरे व त्यांच्या कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने तसेच घरातील रोख रक्कम जबरीने चोरून नेली. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६७५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलिस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असताना ७ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव आवळा परिसरातून प्रदीप ऊर्फ गुड्या बिडकुत्या काळे (वय ३०), अनिल सुल्या पवार (वय ३४), सुविकास बिडकुत्या काळे (वय ४५), रुक्या ऊर्फ लोकेश बिडकुत्या काळे (वय ३५), सर्व रा. पिंपळगाव आवळा, तसेच समाधान ऊर्फ कारभारी दीपक काळे (वय २१, रा. वाकी) यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातील आरोपी प्रदीप काळे याच्याकडे चौकशी केली असता दरोड्यातील इतर साथीदारांची माहिती समोर आली. लवचिक्या ऊर्फ लहु जालिंदर पवार, सोन्या नंग्या काळे आणि परबत ऊर्फ प्रभाकर ऊर्फ दीपक तुकाराम शिंदे हे तिघे फरार असून, सारिका चंदन काळे हिच्या नियोजनानुसार दरोडा टाकण्यात आल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेले सोन्याचे दागिने सारिका काळे व तिचा पती परबत शिंदे यांच्याकडे दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

दरम्यान, समाधान काळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांसह जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, आरणगाव, धामनगाव, वंजारवाडी, बुऱ्हाणपूर व चौंडी परिसरात रात्रीच्या वेळी घरफोड्या केल्याची माहिती दिली. चोरीचे सोन्याचे दागिने बिभीषण सावंत व हनुमंत आबासाहेब वायकर, दोघेही रा. वाकी, यांच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचेही त्याने सांगितले.

आठ घरफोडीचे गुन्हे उघड

या तपासातून जामखेड व खर्डा पोलिस ठाण्यांतील घरफोडी व चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये जामखेड पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. २७९/२०२६, २८५/२०२६, ३२४/२०२६, ३२३/२०२६, ५१७/२०२६, ३९५/२०२६, ६४३/२०२६ तसेच खर्डा पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. १६१/२०२६ यांचा समावेश आहे.

लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

चोरीचे दागिने ठेवून घेणाऱ्या व्यक्तींना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या. पंचांसमक्ष त्यांनी हजर केलेल्या मुद्देमालात सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, बोरमाळ, मणीमंगळसूत्र, गंठण आदी दागिन्यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रुक्या ऊर्फ लोकेश बिडकुत्या काळे याला जामखेड पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ३२४/२०२६ मध्ये हजर करण्यात आले आहे. तसेच तो २०१५ मधील जामखेड पोलिस ठाण्यातील भादंवि कलम ३९४च्या गुन्ह्यातही पाहिजे आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ताब्यातील इतर आरोपींना जप्त मुद्देमालासह जामखेड पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ६७५/२०२६ मध्ये पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलिस करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलिस अंमलदार निळकंठ कारखेले, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब खेडकर, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड, सुनिता पवार व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT