

नगर: महापालिका प्रशासनात शिस्त आणण्यासाठी सातत्याने धडक कार्यवाही करणारे उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी जुन्या महापालिका कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणीत महापालिकेचा अत्यंत ढिसाळ कारभार उघडकीस आला असून, नागरिकांचे महत्त्वाचे जुने दप्तर धुळीत अस्ताव्यस्त पडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या गंभीर प्रकारानंतर उपमहापौरांनी थेट मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना 'व्हिडिओ कॉल' लावून कार्यालयातील दुरवस्थेचा 'लाईव्ह' पंचनामा केला.
गेल्या काही दिवसांपासून जुन्या महापालिका कार्यालयात जन्म-मृत्यू दाखले तसेच इतर विविध दाखले मिळण्यास प्रचंड दिरंगाई होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडे केल्या होत्या. कर्मचारी वेळेवर काम करत नाहीत व सर्वसामान्यांना कामासाठी नाहक हेलपाटे मारावे लागतात, असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत होता. या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेत उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी गुरुवारी जुन्या महापालिकेत अचानक भेट दिली.
उपमहापौर जाधव यांनी कार्यालयात प्रवेश करताच तेथील रेकॉर्ड रूम व अन्य विभागांची बारकाईने पाहणी केली. यावेळी नागरिकांचे अतिशय महत्त्वाचे व ऐतिहासिक रेकॉर्ड असलेले जुने दप्तर अत्यंत अस्ताव्यस्त स्थितीत आणि धुळीच्या साम्राज्यात पडलेले त्यांच्या निदर्शनास आले. नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांची कोणतीही काळजी न घेता ती वाऱ्यावर सोडून दिल्याचे पाहून उपमहापौरांनी उपस्थितांवर तीव्र संताप व्यक्त केला.
त्यानंतर उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी थेट महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला. जुन्या महापालिकेत दप्तराची कशी दुरवस्था झाली आहे, महत्त्वाची कागदपत्रे कशी अस्ताव्यस्त पडली आहेत आणि कर्मचाऱ्यांचा कारभार कसा ढिसाळ सुरू आहे, याचे थेट दृश्य आयुक्तांना दाखवले.
उपमहापौरांच्या या धडक कारवाईमुळे महापालिका वर्तुळात आणि कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या भोंगळ कारभाराला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कडक कारवाई करते, याकडे आता नगरकरांचे लक्ष लागले आहे.