

जामखेड: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला दुसऱ्याच दिवशी ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पहिल्या दिवशी बीड रोडवरील गरिबांच्या टपऱ्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांवर दहा फुटांपर्यंत हातोडा चालविणाऱ्या प्रशासनाची मोहीम समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नरदरम्यान पोहोचताच अचानक मंदावल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच दुपारी एक वाजल्यापासून काम बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता चेमटे आणि त्यांच्या पथकाकडून नगरपरिषद प्रशासनाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण अतिक्रमण हटाव मोहिमेच्या हेतूबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी (दि. ६) सुरुवात झाली. महसूल, नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार शीतल सावळे, मुख्याधिकारी अजय साळवे आणि पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना सुमारे दहा फूट (तीन मीटर) अंतरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी लहान-मोठ्या टपऱ्या आणि बाजार समितीचे गाळे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र, बुधवारी दुसऱ्याच दिवशी बड्या व्यापाऱ्यांना आणि मोठ्या इमारतींवरील कारवाईचा वेग अचानक कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईत सर्वांसाठी समान निकष आहेत का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
मोजमापातील तफावतीने संभ्रम
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या मोजमापात फरक आणि तफावत असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अतिक्रमणाची हद्द निश्चित करताना दोन विभागांच्या मोजमापात तफावत असल्यास ती प्रथम स्पष्ट करावी आणि त्यानंतरच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता चेमटे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला असून, समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नरदरम्यान कारवाई का थांबविण्यात आली, याबाबत प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
‘कारवाई पुन्हा सुरू करा’
महामार्ग विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या मोजमापातील तफावत तातडीने दूर करून अतिक्रमणाची हद्द स्पष्ट करावी. त्यानंतर कोणताही भेदभाव न करता महामार्गाच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करावी आणि थांबलेली मोहीम पुन्हा वेगाने सुरू करावी, अशी मागणी जामखेडकरांकडून होत आहे.