Jamkhed Municipal Council election 2025
जामखेड: विधानसभा निवडणूक होऊन वर्ष उलटत आले तरीही विधानपरिषदेचे सभापती आ. राम शिंदे यांच्या मनातील पराभवाचे शल्य काही कमी होताना दिसत नाही. त्यात अधून मधून अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यांतून जणू त्यांच्या जखमांवर मीठ पडत आहे.
आगामी नगरपरिषद निवडणुकीतही आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात हा संघर्ष पहायला मिळणार आहे. अर्थात, यावेळीही पवारांची ‘भावकी’ नेमकी काय करणार, याकडे शिंदे गटाचे लक्ष असणार आहे. (Latest Ahilyanagar News)
जामखेड तालुक्याच्या राजकारणात प्रा. राम शिंदे यांनी कमबॅक केले आहे. सहकार आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी आ. रोहित पवारांच्या हातातून सत्ता खेचून आणली आहे. मात्र विधानसभेत थोड्या मतांनी झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
आता जामखेड नगरपरिषदेचे नगारे वाजले आहेत. मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सोमवारी दि. 18 रोजी प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 31 ऑगस्टपर्यंत जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. हा प्रारूप प्रभाग रचनेचा गुगल मॅप व प्रभागात येणारा भुभाग याबाबत दर्शनी फलक नगरपरिषद कार्यालयात लावण्यात आला आहे. जामखेड नगरपरिषदेसाठी एका वॉर्डात 2 नगरसेवकांप्रमाणे 12 वार्डात 24 नगरसेवक असणार आहेत.
दि. 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरदरम्यान प्राप्त हरकती व सूचनावर जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकार्यांमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. दि. 26 सप्टेबर ते 30 सप्टेबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगामार्फत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे मुख्याधिकार्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
इच्छुक नगरसेवक लागले तयारीला
इच्छुक नगरसेवक हे गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकीची वाट पाहत असणार्यांसाठी आता कामाला लागणार असल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगळी होते आणि आता या निवडणुकीत देखील राजकीय समीकरणे वेगळे असणार आहे. या निवडणुकीत पुन्हा सभापती प्रा. राम शिंदे आणि आ. रोहित पवार आमनेसामने येणार असल्याने राजकीय वातावरण गरम होणार आहे.