जामखेड: शहरातील अमली पदार्थांचे जाळे आता ग्रामीण भागात पोहोचल्याचे चित्र समोर आले आहे. जामखेड शहराजवळील जामखेड–कर्जत रोडवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी दोघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी (दि. 14 फेब्रुवारी 2026) सकाळी एका फर्निचर दुकानासमोर संशयित मोटारसायकल अडवण्यात आली. तपासणी केली असता आरोपीकडून 6.17 ग्रॅम वजनाचे सुमारे ₹1 लाख 23 हजार 400 किमतीचे मेफेड्रॉन पांढऱ्या प्लास्टिक पाऊचमध्ये आढळून आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ₹20 हजार प्रति ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून ₹1 लाख किमतीची मोटारसायकल व ड्रग्ज असा एकूण ₹2 लाख 23 हजार 400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मंगेश हिरामन पवार (वय 30, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) व मकसुद बागवान (रा. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. हृदय गौतम घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि जामखेड पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत. ग्रामीण भागात ड्रग्ज विक्री उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून अशा रॅकेटवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.