नगर: महिलांनी रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात केल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर होतील, असा विश्वास अहिल्यानगरच्या महापौर ज्योती गाडे यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर येथील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन ॲण्ड टेक्नॉलॉजी (आयएसडीटी) या संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जलतरंग ही टाय ॲण्ड डाय (बांधणी) या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आय. एस. डी. टी. चे संस्थापक विनायकराव देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख, प्राचार्य अरुण गावडे, फॅशन डिझाईन विभाग प्रमुख पूजा पतंगे, स्मिता बडाख, पूर्वा भंडारी, कोमल वांढेकर, रोहन चारगुंडी आदी उपस्थित होते. महापौर गाडे म्हणाल्या की, आजची महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून धडाडीने काम करीत आहे. स्वतःचा आत्मसन्मान टिकविण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीने व महिलेने रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर व्हावे.
विनायकराव देशमुख म्हणाले, महिला आणि मुलींना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण देण्यासाठी 2004 साली एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाची संलग्नता घेऊन आय.एस.डी.टी. संस्था स्थापन करण्यात आली. संस्थेमार्फत डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईनिंग व डिप्लोमा इन फॅशन- टेक्सटाइल डिझाईनिंग हे दोन अभ्यासक्रम चालविले जातात.
आतापर्यंत संस्थेतून 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले असून हे विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. फॅशन डिझायनिंगच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात डाईंग, ब्लॉक प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग, बाटीक, फायबर टू फॅब्रिक, 40 पेक्षा जास्त प्रकारच्या एम्ब्रॉयडरी, आरी वर्क, क्रोशेटिंग, मिरर वर्क, मार्केटिंग, फॅब्रिक सिलेक्शन, पॅटर्न बेकींग, मशीन एम्ब्रॉयडरी अशी 10 ते 12 प्रकारचे कौशल्ये शिकविले जातात. शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या कार्यशाळेत शहरातील 150 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांना प्रथम बांधणी या विषयाचे व नंतर रंगकाम या विषयाचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रास्ताविक फॅशन डिझाईन विभाग प्रमुख पूजा पतंगे यांनी केले. सूत्रसंचालन पूर्वा भंडारी यांनी तर स्मिता बडाख यांनी आभार मानले.