Crime Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Crime: ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीची हत्या, मग स्वत:लाही संपवलं; संगमनेरची धक्कादायक घटना

संगमनेर शहरातील इंदिरानगर येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: तालुक्यातील पठार भागातील दोन चुलत बहिणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी शहरातील इंदिरानगर परिसरात घडल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी संजय खांबेकर (वय 22, माहेरचे आडनाव, रा. घोडेकर मळा) व तिचा पती कुलदीप सुनील अडांगळे (वय 35 इंदिरानगर) या दोघांचा मृत्यू झाला.

याबाबतची माहिती अशी, शहरातील जय जवान चौकात वैष्णवी व कुलदीप राहत होते. पती-पत्नीच्या व्यक्तिगत वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. यामध्ये कुलदीपने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. (Latest Ahilyanagar News)

इंदिरानगर येथील घरामध्ये वैष्णवी हिचा मृतदेह जखमी अवस्थेत आढळला. तर कुलदीप याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. समजलेल्या माहितीनुसार वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. या दोघांमध्ये सतत वाद होत होते. या वादातून ही दुर्दैवी घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या घटनेची माहिती समजताच शहर पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. कुलदीपच्या शवाविच्छेदनानंतर रविवार दि. 7 ला सायंकाळी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तर वैष्णवी संजय खांबेकर हिचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी लोणी प्रवरानगर येथे पाठवण्यात आला आहे.

फॉरेन्सिक अहवालानंतर घटनेचा उलगडा होणार आहे. याबाबत शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. वैष्णवी हिच्यावर संगमनेर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मयत वैष्णवी हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून त्यांना काही धागेदोरे हाती लागले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष पगारे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT