गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ‘बटेंगे तो कटेंगे’ या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनंतर राज्यातील वातावरण पार बदलून गेले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांत लाडक्या बहिणींमुळे महायुतीला कौल मिळाला. पण त्याची परिणती आगामी अहिल्यानगर महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेत उमटल्याचे दिसून येते.
मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग. प्रभाग रचनेत जुन्या प्रभागाची पूर्णत: मोडतोड करत ‘भाईंचा’ वार्ड एकगठ्ठा करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे या भागात दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून येणे जवळपास अशक्य. एकूणच ‘अपना इलाका, अपना राज’ अशा पद्धतीने प्रभाग 4 मधील निवडणूक होईल, असे चित्र आहे. (Latest Pune News)
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या वार्डाचा कौल संमिश्र स्वरूपात लागल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले समद खान, काँग्रेसचे रिजवाना शेख आणि समाजवादी पार्टीचे मीर असीफ सुलतानसोबतच अपक्ष मीनाज जाफर खान त्या वेळी विजयी झाले होते. आता नव्या रचनेत मुकुंदनगरसह, दर्गादायरा परिसर जोडून प्रभाग निर्मिती करण्यात आली आहे.
आ. संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा पुकारा केल्यानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीत या वार्डातील माहोल काहीसा वेगळाच दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांवेळी या प्रभागातील मतदान विखे-जगताप यांच्या विरोधात गेल्याचे निकालातून समोर आले. तेव्हापासून ‘मोहल्ला’चे वातावरण कायम तप्त राहिल्याचे दिसून येते.
आ. जगताप यांचे अनेक समर्थक या भागात असले तरी ‘हिंदुत्वा’च्या भूमिकेमुळे ते दुरावल्याचे चित्र आहे. अर्थात ते दाखवण्यापुरते असेल, असेही मानले जाते. माजी नगरसेवक समद खान यांनी तर थेट ‘एमआयएम’मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या भागात ‘एमआयएम’चा पॅनल उभा राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.
त्याविरोधात महायुतीने उमेदवार दिले तर त्यांच्या विजयाची खात्री कोणी देईल का, हे पाहावे लागेल. ‘एमआयएम’ विरोधात महाविकास आघाडी मात्र पॅनल करणार हे निश्चित. त्यातल्या त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी जोरात राहील, असे चित्र आहे. मात्र या भागाचा पूर्वानुभव पाहता काँग्रेसही या वार्डातील जागांवर दावा ठोकेल, हेही खरे.
माजी नगरसेवक मुदस्सर शेख यांनी ‘तुतारी’साठी जुळवाजुळव सुरू केल्याचे दिसून येते. गतवेळी समद खान यांच्या विरोधात थोड्या मतांनी पराभूत झालेले शम्स खान पुन्हा तयारी करत असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे, पण गेल्या वेळी बसपाकडून लढलेले फैय्याज शेख हेही पुन्हा तयारीत आहेत. अपक्ष म्हणून विजयी झालेल्या मीनाज जाफर शेख पुन्हा तयारी आहेत. एकूणच हे चित्र पाहता ‘तुतारी’च्या पॅनलमध्ये यातील बहुतांश नावे दिसतील असे दिसते. म्हणजे या भागातील लढतीत महायुती दिसली तरी खरा सामना ‘एमआयएम’ आणि ‘तुतारी’मध्ये रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुकुंदनगर परिसरात असलेले आ. जगतापांचे समर्थक काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या निवडणुकीत बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यताही वर्तविली जाते. दर्गादायरा भागाला एक टर्म वगळता प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते, यंदा ते मिळेल, असे मानले जाते.
अंतिम प्रभाग रचना, मतदारयादी अजून निश्चित व्हायची असली तरी मुस्लिम समाजाचे प्राबल्य पाहता येथे याच समाजाच्या दोन गटांत (राजकीय पक्ष म्हणा) लढत होण्याची शक्यता आज तरी दिसते. काही झाले, पक्ष कोणताही असला तरी या भागातून चारही नगरसेवक मुस्लिम असतील, असेच म्हणावे लागेल!
स्कोप नाही, पण डावपेचाची गुगली!
विधानसभेला या वार्डातील बहुतांश मतदान विरोधात गेले असले तरी ठराविक मतदार मात्र आ. जगताप यांच्या पाठीशी होतेच. त्यामुळे आ. जगताप यांचे खास समर्थक या भागात अजूनही आहेत, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. राजकारणात़ कोणीच कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, या उक्तीनुसार राजकीय डाव टाकून ‘मैत्रीपर्व’ कोणाची विकेट काढते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. डॉ. सुजय विखे पाटील ज्या पक्षात आहेत, त्या भाजपची भूमिका आणि आ.संग्राम जगताप यांनी विधानसभेनंतर घेतलेली हिंदुत्वाची भूमिका पाहता या भागात विखे-जगताप मैत्रीपर्वाला किती स्कोप मिळतो, याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष असेल.
समाजाच्या प्रतिनिधित्वात घट?
महापालिकेची प्रारूप वार्ड रचना पाहता मुस्लिम समाजाचे वास्तव्य असलेला मुकुंदनगर परिसर वगळता इतरत्र मात्र मतदार विखुरलेला दिसून येतो. झेंडीगेट, कोठलासारख्या विखुरलेल्या भागात या समाजाला प्रतिनिधित्व मिळणे कठीण दिसते. एकमेव मुकुंदनगर भागात चारही नगरसेवक हे या समाजातून येतील, असे दिसते.
त्यासाठी मात्र या समाजातील उमेदवारांमध्येच लढत होणार, हेही खरे. मुदस्सर शेख हे गेल्या वेळी झेंडीगेट परिसराचा समावेश असलेल्या भागातून बसपाकडून विजयी झाले होते. कुरेशी, नज्जू पहिलवानही या भागातून नगरसेवक झाले होते. मुकुंदनगरचे चार आणि हे तीन असे सात नगरसेवक गेल्या टर्मला महापालिकेत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र मुकुंदनगर वगळता इतर भागांतून या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळते याबाबतही अनेकांना उत्सुकता आहे.