श्रीगोंदा: आषाढी वारीसाठी राज्यभरातून दिंड्या पंढरपूरच्या वाटेने निघाल्या आहेत. घोगरगाव येथे मुक्कामी असताना निमगाव खैरी येथील दिंडी क्रमांक एकचा अश्व चोरीला गेला. तब्बल सात तासांच्या शोधानंतर हा अश्व एका अडगळीच्या ठिकाणी बांधून ठेवल्याचे दिसून आले. गावातील एका तरुणाने तो इतरत्र विक्री करण्याच्या उद्देशाने घराजवळ आणून बांधून ठेवल्याचे उघड झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील दिंडीत विजय परदेशी यांचा बादल नावाचा अश्व गेल्या आठ वर्षांपासून या दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहे. दिंडी तालुक्यातील घोगरगाव येथे मुक्कामी होती. (Latest Ahilyanagar News)
भजन झाल्यानंतर वारकरी निद्रिस्त झाले. अश्वाचे मालक विजय परदेशी यांना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जाग आली. ज्या ठिकाणी अश्व बांधला होता तिथे तो नसल्याने त्यांनी आजूबाजूला त्याचा शोध घेतला.
सहकारी वारकर्यांना उठवत अश्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही शोधाशोध सुरू असतानाच सकाळ झाली. दिंडीतील अश्व चोरीची वार्ता गावात समजली. गावकर्यांनीही या अश्वाचा शोध घेतला.
गावात शोध सुरू असतानाच अश्वाचे मालक विजय परदेशी यांचा आवाज ऐकून अश्व खिंकाळला. अश्वाचा आवाज ज्या दिशेने आला त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एकदम अडगळीच्या ठिकाणी हा अश्व बांधून ठेवण्यात आला होता. अश्वाला पाहताच वारकर्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
बाजूच्या पडवीत झोपलेल्या तरुणाकडे याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले, की हा अश्व रस्त्याने चालला होता म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो. सकाळी त्याला घेऊन तुमच्याकडे येणारच होतो. असे उत्तर देत आपण निर्दोष असल्याचा कांगावा केला. दरम्यान, चोरीच्या संशयावरून त्या तरुणाला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र कायदेशीर सोपस्कार करण्यात वेळ जाणार असल्याने अश्वमालक परदेशी यांनी फिर्याद देण्यास नकार दिला.
आमचा अश्व मिळाला यातच समाधान
अश्व मालक विजय परदेशी म्हणाले, की अश्व चोरीस गेल्याचे समजताच माझ्यासह दिंडीतील वारकरी अस्वस्थ झाले होते. जवळपास सात तास या अश्वाचा शोध घेतला. चोरीच्या उद्देशाने हा अश्व एका अडगळीच्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आला होता. आम्ही शोध घेत त्या भागात गेलो असता माझा आवाज ऐकून अश्व खिकाळला अन् आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.
संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई
पोलिस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले, श्रीरामपूर येथील दिंडीसोबत चालणारा अश्व चोरी गेल्याची घटना घडली होती. शोध घेतल्यानंतर तो मिळून आला. अश्व मालकाची फिर्याद देण्याची तयारी नसल्याने आम्ही संबंधित संशयित तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.