Ambit Dam Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Rain Update: अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार पाऊस; अंबित धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अकोले, पारनेर, संगमनेरसह जिल्हाभर पावसाची जोरदार हजेरी; मुळा खोऱ्यातील अंबित धरण भरले, खरीप पिकांसह भात रोपांना जीवनदान

पुढारी वृत्तसेवा

नगर/ अकोले/पारनेर: आकाशात ढग दाटले पण पाऊस कोसळण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना रविवारी दिलासा मिळाला. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. अकोले आणि पारनेर तालुक्यातील आर्द्राची जोर‘धार’ कोसळल्या. मुळा खोऱ्यातील पहिले अंबित धरण या जोरदार पावसाने ओव्हर फ्लो झाले. सुपा, पारनेरमधील नाले खळखळून वाहिले तर बांधबंधारे भरल्याने शेतकरी काहीसा सुखावल्याचे चित्र आहे. नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेरसह अहिल्यानगर शहरातही आर्द्राच्या पावसाने हजेरी लावली.

मुळा पाणलोट क्षेत्रात शनिवारी जोरदार पाऊस पडला. रविवारी सकाळी १९३ दशलक्षघफू क्षमतेचे अंबित धरण ओव्हर-फ्लो झाले. अंबितमधील ओव्हर फ्लोचे पाणी आता पिंपळगाव खांड धरणाच्या दिशेने झेपावले आहे. पिंपळगाव खांड धरण भरल्यानंतर मुळा पात्रातून थेट मुळा धरणात आवक सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गत तीन दिवसांपासून मुळा पाणलोटात पावसाची जोरधार सुरू आहे. पाणलोटातील हरिश्चंद्रगड आणि परिसरात कोसळणाऱ्या पावसाने मुळा खोऱ्यातील गडाच्या पायथ्याशी असलेले १९३.९७ दशलक्ष घनफूट क्षमतेचा अंबित लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. पिंपळगाव खांड धरणाच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग जास्त असल्याने ते लवकरच धरणात पोहोचणार असल्याचे चित्र आहे.

पिपळगाव खांड हे धरण ओव्हर फ्लोचे पाणी नदी पात्राद्वारे थेट मुळा धरणाच्या दिशेने झेपावणार आहे. त्यामुळे राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डीतील शेतकऱ्यांच्या नजरा आता पिंपळगाव खांड धरण भरण्याकडे लागल्या आहेत. पारनेरसह सुपा परिसरात रविवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उशिरा का होईना पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

यंदा वर्षी रोहिणी, पूर्वासह एकामागून एक नक्षत्रे कोरडे जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु रविवारी (दि. २८) दुपारी तीन वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. यादरम्यान भोयरे गांगर्डा, कडूस, बाबुर्डी, रूईछत्रपती आदी ठिकाणी जोरदार, तर पारनेर सुपा, वाघुंडे, हंगा, मुंगशी, म्हसणे, वडनेर हवेली, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, आपधूप, शहाजापुर, पळवे, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रुईछत्रपती, भोयरे गांगर्डा, कडूस, बाबुर्डी याठिकाणी एक तास पावसाने हजेरी लावली. यादरम्यान ओढे, केटीवेअर, नाले व शेतातील ताली तुडुंब भरून वाहू लागल्या.

संगमनेरात पावसाची हजेरी

शहरासह तालुक्यात काल रविवारी (दि. २८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सुमारे दीड तास पाऊस सुरू होता. पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहेत. सायंकाळच्या सुमारास घरी जाणारे नागरिक, व्यापारी, भाजी विक्रेते, फेरीवाले पावसात अडकले होते. रात्री उशीरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता.

अहिल्‍यानगर शहरात पावसाच्या सरी

अहिल्‍यानगर शहरात तिसर्‍या दिवशीही रविवारी (दि.२८) पावसाने हजेरी लावली. दुपारी दोन वाजेच्‍या सुमारास शहरातील काही मध्‍यवर्ती भाग, माळीवाडा, स्‍टेट बँक चौक, तारकपूर, मुकुंदनगर आदी ठिकाणी मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस झाला. त्‍यानंतर सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. रात्री ८ वाजेच्‍या सुमारास पावसाने पुन्‍हा हजेरी लावली. या पावसाने काही सखल भागांत पाणी साचले, घराबाहेर पडलेल्‍या नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत आभाळ दाटून आले होते.

जिरायत पिकांना मिळाले टॉनिक

पेरणीपूर्व मशागत झाल्यानंतर जूनच्या १४ ते १६ तारखेदरम्यान परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यादरम्यान काही शेतकऱ्यांनी मूग, बाजरी, मका पिकाची पेरणी केली. मात्र, सलग पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने उगवण झालेले उभे पीक कोमजू लागले. काही शेतकऱ्यांनी मात्र जिरायत पट्ट्यात पेरणी केली. त्या पिकांना मात्र रविवारी झालेला पाऊस वरदान ठरला.

भात रोपांना मिळणार दिलासा

अंबित लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मुळा खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर रिमझिम पाऊस सुरुच असल्याने हरिश्चंद्रच्या पर्वतरांगेत उगम पावणारी मुळा नदी वाहती झाली आहे. मुळा पाणलोटातील पावसामुळे भात रोपांना दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT