Heatwave Pudhari
अहिल्यानगर

Heatwave Nagar 41°C: नगरमध्ये उष्मालाटेचा यलो अलर्ट; पारा 41 अंशांवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

14 मेपर्यंत उष्णतेची शक्यता; हवामान विभागाचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी मंगळवारीदेखील उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिकांची होरपळ सुरूच होती. दुपारी शहरातील रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्या होत्या. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 14 मेपर्यत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हाभरात ‌‘यलो अलर्ट‌’ जारी करण्यात आला असून, योग्य ती दक्षता घ्या असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केली आहे.

दोन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे सोमवारी तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या आसपास होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.12) तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअस नोंदला गेला. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास प्रारंभ झाला. दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते.

कामानिमित्त घरांबाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा होरपळत असून, हवामान खात्याने 14 मेपर्यंत उष्मालाटेची शक्यता व्यक्त केल्याने जनतेच्या पोटात गोळा आला आहे. उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, घरची लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी आदींचा नियमित वापर करा, ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा, अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हे टाळा

दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. भरपूर पाणी प्या. मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी 1077, 102, 104, 108 व 112 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन दादासाहेब गिते यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT