Rain in Ahilyanagar :
नगर : जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी दुपारी व सायंकाळी वादळी वार्यासह पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे बर्याच ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकर्यांची धावपळ झाली. काही ठिकाणी कांदा भिजल्याने शेतकर्यांचे नुुकसानही झाले. नगर तालुक्यात गुणवडी, नेवासा तालुक्यात सोनई परिसर, तसेच श्रीरामपूरच्या काही भागात, पाथर्डी तालुक्याच्या काही भागात दुपारी व सायंकाळी तुरळक पाऊस व गारपीट झाली. मात्र वादळी वार्यामुळे बर्याच भागात नुकसान झाले. (Ahilyanagar News Update )
गुणवडीत कांदा झाकण्यासाठी धावपळ
नगर तालुक्यातील गुणवडी परिसरात वादळी वार्यासह गारपीट व पाऊस झाला. तालुक्यातील दक्षिण काही भागात अवकाळी पावसाने दणका दिल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वादळी वार्यासह, विजांच्या कडकडाटात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कांदा पीक झाकण्यासाठी शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
तालुक्यातील गुणवडी, देऊळगाव सिद्धी, खडकी, वडगाव तांदळीसह काही भागात सोमवारी दुपारी चार वाजचेच्या सुमारास वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. गुणवडी परिसरात जोरदार गारपीट झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांची एकच धांदल उडाली . शेतातील काढून पडलेले कांदापीक झाकण्यासाठी भर पावसात शेतकर्यांची पळापळ सुरू झाली. नुकसानीच्या धास्तीने विजांच्या गडगडाटात जिवाची पर्वा न करता हाती लागेल तो तळवट, पान कागद घेऊन कांदा झाकण्यासाठी धांदल उडाली.
शेवटच्या घटका मोजणार्या फळबागांना पावसामुळे जीवदान मिळाले आहे. चारा पिकांनाही पावसामुळे मोठा आधार मिळाला. गुणवडी, देऊळगाव सिद्धी येथे झालेल्या गारपिटीमुळे शेतात काढून पडलेले कांदा पीक भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वार्यामुळे परिसरातील चिकू, तसेच आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले.
आधीच कांद्याचे गडगडलेले भाव, त्यामुळे झालेला कांद्याचा वांदा, त्यातच अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हातचा जातोय की काय, अशी भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे.
तिसगावमध्ये गारपीट; व्यापार्यांसह शेतकर्यांची धांदल
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह गारपिटीचा पाऊस झाला. संपूर्ण गाव परिसरात गारपिटीचा अक्षरशः खच साचला होता.त्यामुळे तिसगाव येथील व्यापार्यांसह शेतकर्यांची देखील मोठी धांदल उडाली. अचानकच गारपीट सुरू झाल्याने शेतात साठवलेला कांदा झाकवण्यासाठी त्याच बरोबर कुरडया पापड करणार्या महिलांची देखील काहीशी धावपळ झाली. वृद्धेश्वर चौक, शेवगाव रोड या महत्त्वाच्या दोन्ही मुख्य चौकामध्ये गारांचा अक्षरशः सडा पडला होता. तिसगाव मधील अनेक छोट्या मोठ्यांनी महामार्गावर पडलेल्या गारा वेचून घेण्याचा प्रयत्न केला. सुमारे दहा ते पंधरा मिनिट झालेल्या या गारपिटीच्या पावसामुळे तिसगाव मधील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. तिसगावसह परिसरातील इतर गावातही पावसाचा हलकासा शिडकावा झाला. वादळी वार्यामुळे संत्रा फळबागांची देखील फळ गळती झाल्याने फळबाग धारक शेतकर्यांचे देखील काही प्रमाणात या अवकाळी वादळी पावसामुळे नुकसान झाले
सोनईत वादळी वार्यासह गारपीट
सोनईत सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वार्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. सुमारे तासभर पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. गारांच्या पावसामुळे शेतीवर परिणाम होणार आहे. गेल्या काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला आहे. बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली, तरी उष्म्यात वाढ होत आहे. सकाळी उन्हाच्या झळा, तर दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. वातावरणात उष्मा कमालीचा जाणवत आहे.
परिसरात पहिल्याच पावसाने शेतकर्यांची तारांबळ उडाली आहे. आंबा व नारळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसस्थानक परिसर, नवीन वांबोरी रस्ता, मुळा संस्था परिसर, वंजारवाडी यशवंतनगर, दत्तनगर, बेल्हेकरवाडी, श्रीरामवाडी, लांडेवाडी, गणेशवाडी, हनुमानवाडी, शनिशिंगणापूर, पानसवाडी परिसरात झाडांचे व विजेचे खांब पडल्याने नुकसान झाले आहे.