Sangamner Grandfather Grandson Drowning Pudhari
अहिल्यानगर

Grandfather Grandson Drowning: नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी शेततळ्यात उडी घेतली; दोघांचाही दुर्दैवी मृत्यू

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील हृदयद्रावक घटना; पाय घसरून नातू पडला, वाचवताना आजोबांचाही बुडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: नातवाला वाचविण्यासाठी आजोबांनी जीवाची बाजी लावली, मात्र नियतीने दोघांनाही हिरावून नेले. शेततळ्यात बुडणाऱ्या नातवाला वाचवण्यासाठी धावलेल्या आजोबांचाही त्याच्यासोबत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५) आणि सर्वेश संतोष गुळवे (वय १३, दोघेही रा. गुळवे वस्ती, सावरगाव तळ,) अशी मृत झालेल्या आजोबा-नातवांची नावे आहेत.

या घटनेची माहिती अशी की, गुळवे कुटूंब हे वस्तीवर राहातात. त्यांच्या घराशेजारीच शेततळे आहे. रविवारी सायंकाळी सर्वेश हा शेततळ्याजवळ गेला आणि काही समजण्याच्या आतच तो पाय घसरून शेततळ्यात पडला. ही घटना त्याच्या मोठ्या बहिणीने पाहीली. तिने तत्काळ मदतीसाठी आरडाओरड केला.

जवळच असलेल्या आजोबा पांडुरंग गुळवे यांनी हा आवाज ऐकला. त्यांनी तिकडे धाव घेतली. नातू शेततळ्यात बुडताना पाहून त्यांनी क्षणाचाही विचार न करता थेट पाण्यात उडी घेतली. मात्र, शेततळ्याच्या प्लास्टिक कागदावरील मऊपणा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही शेततळ्यातच अडकले आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करुनही त्यांना बाहेर पडता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शेततळ्याकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही वेळाने त्या दोघांनाही बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांना रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा या दोघांवर सावरगाव तळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT