

चांदा: नेवासा तालुक्यातील चांद्याचा पिण्याचा पाण्याचा वनवास गेली दहा-पंधरा वर्षांपासून अखंड सुरू आहे. यंदा मात्र भर पावसाळ्यात चांदा ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपय खर्चाची वाजत-गाजत आलेली जलजीवन योजना अर्धवटच गुंतल्याने आता पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर वणवण टकण्याची वेळ आली आहे.
संध्या गावची पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई हा जणूकाही नित्याचाच विषय झाला आहे. ळा उजव्या कालव्याला पाणी आल्यानंतर चोहीकडे पाणीच पाणी असते. मात्र, लाखो रुपये खर्च होऊनही चांद्याच्या वनवास कायमच आहे. त्या काळात महिनाभर सर्वजण पाणीटंचाई विसरून जातात. मात्र,मुळा उजव्या कालव्याचे पाणी बंद झाले की नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा वणवण करण्याची वेळ येते.आताही तसाच प्रकार सुरू आहे. मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा पाणीयोजनेच्या दोन्ही विहिरींना होता.आता या दोन्ही विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत.
भर पावसाळ्यात या विहिरींना थेंबभर पाणी येईना. तर शासनाची महत्त्वकांक्षी असलेली जलजीवन योजना अर्धवट स्थितीत पडून आहे. या योजनेचे पाईपलाईनचे काम अर्धवट आहे. तर पाणीसाठवणीचा तलावाचे कामही अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी टाकीचे काम अर्धवट आहे. चांदा गावासाठी ही योजना वरदान ठरणारी होती! मात्र आजही हे काम अर्धवट स्थितीत बंद पडल्याने जलजीवन चांदेकरांसाठी मृगजळच ठरण्याची शक्यता आहे.चांदा गावच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन विहिरी मुळा उजव्या कालव्या लगत आहेत.मात्र, यावेळी विहिरींनीही भर पावसाळ्यात तळ गाठल्याने पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेले चांदा गाव पिण्याच्या पाण्यावाचून हाल सहन करीत आहे.
त्यामुळे तालुका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने गावात टँकर चालू करण्याची मागणी चांदा ग्रामस्थांनी केली आहे . चांदा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने या ठिकाणी प्रशासकराज आहे. विद्यमान सरपंच हेच प्रशासक आहेत.परंतु त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार न्यायप्रविष्ट झाल्याने पिण्याच्या पाण्यासंदर्भात तेही काहीही निर्णय घेऊ शकत नाही .
‘मुळा’चे आवर्तन सोडा
चांदा गावासह आसपासच्या खेडेपाड्यातील नागरिकांची पिण्याची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आपला खरीप हंगाम वाचवण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने मुळा उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी चांदा गावातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी केली आहे . पाणी टंचाईचे संकट त्याशिवाय तातडीने दूर करण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. मुळा धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने नदीला पाणी सोडण्याऐवजी मुळा उजव्या कालव्यातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे .