Mula Dam Water: मुळा धरण भरतेय, पण शेतकरी तहानलेलाच! कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी

पाणलोटात १,५०० मिमी पाऊस, लाभक्षेत्रात अवघा २०० मिमी; जायकवाडी ९४ टक्के भरल्याने मुळाचे पाणी शेतीसाठी वापरण्याची मागणी
Mula Dam
Mula DamPudhari
Published on
Updated on

राहुरी: मुळा पाणलोटात चांगला पाऊस झाल्याने धरण पाणीसाठा वाढत आहे, परंतु लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने आजही खरीप पिके तहानलेलीच आहेत. त्यामुळे भर पावसाळयातही धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणीही पुढे येताना दिसत आहे.

Mula Dam
Ahilyanagar Municipal Worker Attack: महापालिका कामगारावरील हल्ल्यानंतर तिघे हैदराबादला पसार; नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुळा पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत सरासरी दीड हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाल्याने मुळा धरणाने २२ हजार ५१६ दलघफूंचा टप्पा गाठला आहे. मात्र लाभक्षेत्रावर झालेला पाऊस अवघा २०० मिलिमीटरच्या आसपास असल्याने धरण भरत असतानाही शेतकरी मात्र तहानलेला आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्यापेक्षा कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्यास त्याचा थेट आणि अधिक व्यापक लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Mula Dam
Nashik Pune Railway Protest: नाशिक पुणे रेल्वेसाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय एल्गार; सरळ मार्गावरूनच रेल्वेची मागणी

मुळा धरणाची सायंकाळी ६ वाजता २२ हजार ७०० दलघफू झाला. कोतूळ येथून धरणात होणारी आवक मात्र घटून ७४४ क्यूसेक झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने आवकेत मोठी घट झाली असली, तरी पूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज का?

जायकवाडी धरणाचा जलसाठा जवळपास ९४ टक्क्यांवर पोहोचल्याने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. जायकवाडी सक्षम असल्याने मुळा धरणातून केवळ अतिरिक्त पाणी म्हणून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची घाई करण्याची गरज नसल्याचे चित्र आहे. उलट, मुळा धरणातील पाण्याचा शेतकरी हितासाठी थेट वापर करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यापेक्षा मुळा डावा आणि उजवा कालवा कार्यान्वित करून सिंचनासाठी पाणी सोडल्यास त्याचा लाभ हजारो हेक्टर क्षेत्राला होऊ शकतो, अशी भावना लाभक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Mula Dam
Shrigonda Police: श्रीगोंदा पोलिसांची धडक कामगिरी; CMIS पोर्टलवर ७,७१९ आरोपींची नोंद, जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी १,५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे चित्र असताना लाभक्षेत्रात केवळ २०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही तफावतच यंदाच्या पाणीस्थितीचे विदारक वास्तव स्पष्ट करते. धरणातील पाणी वाढत आहे; मात्र लाभक्षेत्रातील विहिरी, शेततळी आणि पिकांना अद्याप अपेक्षित पावसाची साथ मिळालेली नाही. त्यामुळे ‘धरण भरले, पण शेतकऱ्याची तहान भागली का?’ हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

कालव्यांना प्राधान्य द्या!

मुळा धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करताना शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरवाजातून पाणी सोडण्याऐवजी कालव्यांद्वारे नियोजनबद्ध पाणी सोडल्यास पिकांना जीवदान मिळू शकते. विशेषतः लाभक्षेत्रात पावसाची कमतरता असल्याने सिंचनासाठी पाणी देणे अधिक परिणामकारक ठरणार आहे.

Mula Dam
Vambori Chari Stage: वांबोरी चारी टप्पा दोनला वेग; १२ गावांतील ३२ तलावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार

दमदार पावसाची प्रतीक्षा

सध्या धरणात स्पिलवे, मुळा उजवा कालवा आणि मुळा डावा कालवा यातून विसर्ग सुरू नाही. आवकही ७०४ क्युसेकपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आगामी काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची दमदार हजेरी लागल्याशिवाय दरवाजातून अतिरिक्त पाणी सोडण्याची शक्यता कमी आहे. मात्र या काळात धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मुळाचे पाणी मुळा नदीत वाहून जाण्यापेक्षा ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले, तरच धरणाच्या वाढत्या जलसाठ्याचे खरे सार्थक होईल, अशी अपेक्षा आता लाभक्षेत्रातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news