करवसुलीतून ग्रामपंचायती होणार समृद्ध Pudhari
अहिल्यानगर

Gram Panchayat Tax Collection: करवसुलीतून ग्रामपंचायती होणार समृद्ध; स्वनिधीत तब्बल 140 कोटींची भर

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या उपक्रमामुळे करप्रणालीत सुधारणा; गावनिधीत 20 कोटींची वाढ अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये नव्याने सर्व्हेक्षण करून, घरपट्टीसोबतच पाणीपट्टी तसेच गाळे भाड्यामध्ये सुधारीत करप्रणाली लागू करण्यात येत आहे. त्यानुसार, गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल 20 कोटींची ग्रामनिधीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मागील थकीत आणि चालू अशी एकूण सुमारे 142 कोटी रुपयांची वसूली करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी मायक्रो प्लॅन तयार केला आहे. गावचा पैसा गावकऱ्यांच्याच सोयी सुविधेसाठी वापरला जाणार असल्याने ग्रामस्थांमध्ये तशी जनजागृती करून वसुली केली जाणार आहे.(Latest Ahilyanagar News)

ग्रामनिधी अर्थात स्वः निधी हा ग्रामपंचायतीच्या उत्पनातून मिळतो. यात पाणीपट्टी, घरपट्टी आणि गाळे भाडे याचा समावेश होतो. या रक्कमेतून 5 टक्के दिव्यांग, 10 टक्के महिला व बालकल्याण आणि 15 टक्के मागासवर्गीयांच्या सुविधांसाठी खर्च केला जातो. याशिवाय उवर्रीत 70 टक्के निधीतून गावातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, नाल्या सफाई, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा, कर्मचारी वेतन इत्यादी सेवा देण्यासाठी खर्च केला जातो. त्यामुळे ग्रामनिधीला गावच्या विकासात मोठे महत्व आहे.

गेल्यावर्षीची 53 कोटींची पट्टी थकली

जिल्ह्यातील 1321 ग्रामपंचायतीकडे 2024-25 या आर्थिक वर्षातील घरपट्टीची 36 कोटी, पाणीपट्टीचे 16 कोटी, तर व्यापारी गाळ्यांचे 2 कोटींचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे सुमारे 53 कोटींची थकीत वसूली करण्यासाठी सीईओ भंडारी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी सर्व बीडीओ तसेच ग्रामसेवकांना सक्त सूचना केल्या आहेत.

चालू वर्षी 91 कोटींचा ग्रामनिधी मिळणार

नवीन कररचनेनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात सर्व ग्रामपंचायतींना घरपट्टीतून 60 कोटी, पाणीपट्टीतून 28 कोटी आणि गाळे भाड्यातून 34 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या रक्कमेतून ग्रामपंचायतींना ग्रामस्थांना सोयीसुविधा पुरवता येणार आहेत. त्यामुळे वसुली करण्यावर ग्रामसेवकांना भर देण्याच्या सूचना आहेत.

वसुली न झाल्यास विकासावर परिणाम

गेल्यावर्षीची 53 कोटी आणि चालू वर्षीची साधारणतः 91 कोटी अशी एकूण 142 कोटींची कर वसुली येणे अपेक्षित आहे. ग्रामस्थांनी आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी कर भरणे अभिप्रेत आहे. कर भरल्यानंतर ग्रामसभेत प्रशासनाला जाब विचारण्याचाही नैतिक अधिकार असतो. अर्थात, त्यासाठी ग्रामपंचायतींनी करातून मिळणाऱ्या पैशांच्या खर्चाबाबत विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सीईओंच्या निर्णयामुळे ग्रामपंचायती समृद्ध

सीईओ भंडारी यांनी ग्रामपंचायतींचा वसूलीचा आढावा घेताना जुनी घरे आज नवी झाली आहेत, वाढीव बांधकामे झाली आहेत, याकडे लक्ष वेधताना सर्वप्रथम जुनी कर आकारणी पद्धत बदल्याच्या सूचना केल्या. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले. आता नव्याने कर पद्धती लागू करण्यात आल्याने यावर्षी दरवर्षीपेक्षा घरपट्टी 14,71,28,751 रुपयाने वाढणार आहे. पाणीपट्टी 5,99,74,515 वसूली मिळणार आहे. व्यापारी गाळे 10,05,289 भाडे मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी 20 कोटी 81 लाख 08,555 रुपये ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी पुढे..!

ग्रामपंचायत सदस्यांकडे तीन महिन्यांचा कर थकला तर त्यांचे पद धोक्यात येते. त्यामुळे सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्यांना कर भरणे बंधनकारक केले जाणार आहे. त्यानंतर गावातील शासकीय कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्याकडे कर वसुली केली जाणार आहे. त्यानंतर ग्रामस्थांना कराची बिले पाठवली जातील. त्यानंतर कायदेशीर नोटीस देण्याचा पर्याय अवलंबवला जाणार असल्याचे समजते.

ग्रामनिधीत जमा होणारी वेगवेगळ्या करांची रक्कम ही गावातील संबंधित घटकांसह त्यांच्या मुलभूत सोयीसुविधांवर खर्च केली जाते. त्यामुळे ग्रामस्थांनीही आपली जबाबदारी ओळखून कर भरून ग्रामविकासात हातभार लावणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी, गावातील शासकीय कर्मचाऱ्यांपाठोपाठ ग्रामस्थांनाही कराची बिले पाठवली जातील.
आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT