

नगर : दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांचा परतीचा प्रवास सुरु झाला. गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर शहरातील तीनही बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. एसटी महामंडळाच्या बस हाऊसफूल धावत असून, गर्दीची तीव्रता लक्षात घेऊन पुणे, नाशिक व मुंबईसाठी अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आली आहे.(Latest Ahilyanagar News)
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारपासून (दि.19) एसटी महामंडळाच्या तारकपूर, माळीवाडा व स्वस्तिक या तीनही बसस्थानकांवर गावी जाण्यासाठी प्रवाशांच्या गर्दीस प्रारंभ झाला. पाडवा व भाऊबीज या दोन दिवशी मात्र बसस्थानकांवर गर्दी नव्हती. दिवाळी व भाऊबीज सण साजरा केल्यानंतर गावांकडे आलेल्या चाकरमान्यांना नोकरीवर जाण्याचे वेध सुरु झाले. दिवाळीनंतर रविवारपासून परतीचा प्रवास सुरु झाला. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, कल्याण, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांकडे जाण्यासाठी रविवारी या तीनही बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. सोमवारी (दि.27 ) देखील बसस्थानकांवर तीच गर्दी आढळून आली.
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाने या दोन्ही दिवशी पुण्यासाठी 183, नाशिकसाठी 80 तर मुंबईसाठी 24 अशा तब्बल 287 नियमित आणि जादा बस सोडण्यात आल्या होत्या. तारकपूर बसस्थानकातून नियमित बसशिवाय दर पाच मिनिटांच्या फरकाने पुण्यासाठी विनाथांबा बसदेखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत.