पुणतांबा: यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे गत सात महिन्यांपासून गोदावरी नदी वाहती आहे. नदीवरील वसंत बंधाऱ्याचे पाणीही पूर्ण क्षमतेने साठविल्याने काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली आहेत. गोदावरीत पुढील तीन-चार महिने पाणी साठा राहणार असल्याने शेतकऱ्यासह ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे.
यंदा गेल्या मे महिन्यात सुरू झालेला पाऊस तब्बल सहा महिने म्हणजे ऑक्टोबरपर्यंत सुरू होता. यामुळे परिसरातील ओढे, नाले वाहिले तसेच विहिरींच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली. येथील पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर घाटावरील जमिनीतून पाणी वाहू लागले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी गोदावरी वाहती होती. नदीवरील वसंत बंदर यातही पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे नदीच्या होळकर आणि ब्राह्मण या दोन्ही घाटावरील अनेक मंदिरे तसेच घाट पाण्याखाली आहेत.
दुथडी भरून पाणी असलेली गोदावरी आणि परिसरातील तुडुंब भरलेल्या विहिरी यामुळे परिसरात यंदा ऊस पिकाच्या क्षेत्रात वाढ होणारा असून रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकरी तसेच ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे.
यंदा वाळू उपशाला आळा ?
येथील गोदावरी नदी पात्रातील गेल्या आठ-दहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रचंड वाळू उपशामुळे पात्रातील खडके उघडे पडले होते. मात्र यंदा गोदावरीला चार-पाच वेळा मोठा पूर आल्याने या पाण्यामुळे पात्रातील वाळू साठ्यात वाढ होणार असल्याचे बोलले जाते. परंतु पुढील चार-पाच महिने म्हणजे एप्रिल -मे अखेर पाणीसाठा टिकून राहील, यामुळे वाळू उपशास आळा बसणार असल्याचा अंदाज आहे.