श्रीरामपूर : गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे आहे. समुद्राला वाया जाणारे 55 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 90 हजार कोटी खर्चाची योजना नियोजित आहे. प्रत्येक ‘बेघराला घर’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवास योजनेचा उद्देश आहे. योजना शासनाची आहे व त्यासाठी शासनाने जमीन दिली आहे. तेव्हा हि योजना पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी असल्याने योजना सुरू ठेवा, अडथळे आणणारांचा बंदोबस्त मी करतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी केले.
बेलापूर बु. ग्रामपंचायत अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व चौक सुभोभिकरण शुभारंभ, घरकुल (रो-हाऊस) जागा वाटप, शाळकरी विद्यार्थ्यांना 150 सायकलींचे वाटप यासह 6 कोटी 12 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, नानासाहेब पवार, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, नाना शिन्दे, पोपटराव जाधव, रामराव शेटे, केतन खोरे, विराज भोसले, किशोर बनकर, डा. शंकरराव मुठे, भिमा बागुल, संजय छल्लारे, रवी पाटिल, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, गणेश मुदगूले, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, गटविकास अधिकारी विवेक गुंड, विस्तार अधिकारी विजय चराटे, अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख, स्वाती अमोलिक, तबसुम बागवान, प्रियांका कुऱ्हे, ग्रामपंचायत अधिकारी नीलेश लहारे आदि उपस्थित होते.
शरद नवले यांनी बेलापूर हे रेसिडेन्शिअल हब तसेच तिर्थस्थळ म्हणून विकसित करण्याचा मनोदय आहे. 15 कोटी खर्चाचा नदीसंवर्धन विकासाचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे. बेलापूर-केशव गोविंद बन व उक्कलगाव या त्रिस्थळीसाठी बोटिंग, नावघाट ते केशव गोविंद घाट विकास यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अद्ययावत व्यायामशाळा, स्पर्धा परीक्षा केंद्र, महिला बचत गट भवन, क्रीडा संकुल अशी कामे करायची आहेत. त्यासाठी मंत्री विखे पा.यांनी निधी उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे. नतद्रष्ट विरोधक चांगल्या कामाला आडवे येत आहेत. घरकुल वसाहतीला राधाकृष्ण नगर व सुजयनगर नामकरणाला विरोध केला. यांचे संगमनेरचे नेतेही दहा वर्षे मंत्री होते. त्यांनी बेलापूरसाठी काहीही केले नाही फक्त आश्वासने देवून झुलवत ठेवले अशी टीका नवले यांनी केली.
प्रास्ताविकात अभिषेक खंडागळे यांनी गेल्या पाच वर्षातील विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी सरपंच मिनाताई साळवी, रणजीत श्रीगोड, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईलभाई शेख आदिंनी मनोगत व्यक्त केले. गोपी दाणी यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सुचनेस मोहसीन सय्यद यांनी अनुमोदन दिले तर माजी उपसरपंच मुश्ताक शेख यांनी आभार मानले. सूत्रसंचलन संतोष मते यांनी केले. यावेळी ग्रामस्थ,गावकरी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रवरा व गोदावरी कालव्यांचे नुतनीकरण, लाभक्षेत्रातील सर्व चरांचे नुतनीकरण यासह वळदगाव को.प. बंधाऱ्याचे 70 कोटी खर्चाची तरतूद करुन व्हर्टीकल बरेजमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच बेलापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे विखे यांनी सांगीतले. निकष काय असावेत हे शासन बघेल.किती मीटरचे रस्ते असावेत यापेक्षा प्रत्येक गरजुला घर मिळणे महत्वाचे आहे. तेव्हा तक्रारी करणारांचे टेन्शन घेवू नका. त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते माझ्यावर सोपवा, असेही ते म्हणाले.