Global Wari Pudhari
अहिल्यानगर

Wari 2026: लंडन ते पंढरपूर व्हाया 11 देश, ‘ग्लोबल वारी’ ; 25 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचलणार

London to Pandharpur wari: भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते उद्घाटन; युरोपातील अनेक देशांतील वारकरी प्रथमच आषाढी वारीत सहभागी होणार

पुढारी वृत्तसेवा

London to Pandharpur Global Wari 2026

पाथर्डी: वारकरी संप्रदायाचा भक्ती, समता आणि संस्कारांचा संदेश आता जागतिक स्तरावर पोहोचत असून लंडन ते पंढरपूर या ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’चा शुभारंभ भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते लंडन येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या उपक्रमामुळे युनायटेड किंगडम, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांतील वारकरी प्रथमच थेट पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार असून, विठ्ठल नामाचा गजर आता सातासमुद्रापार दुमदुमणार आहे.

तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना करून भगवान श्री पांडुरंगाच्या भक्तीचा पाया रचला. संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांनी जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांसाठी भक्तीमार्ग खुला केला. त्यांच्या अभंग, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून समाजाला समता, बंधुता आणि अध्यात्माची दिशा मिळाली.

याच संतपरंपरेचा जागतिक विस्तार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल वारी’मुळे अनेक परदेशी नागरिकांना वारकरी संप्रदायाची ओळख होणार आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून, भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीचे दर्शन जगाला घडविणारा हा उपक्रम ठरणार आहे. यावेळी मार्गदर्शन करताना महंत डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले की, पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती संस्कार, समता आणि आत्मपरिवर्तनाचे विद्यापीठ आहे.

संतांच्या संगतीतून माणसामध्ये विनम्रता, त्याग, सहिष्णुता आणि आत्मचिंतनाची भावना विकसित होते. वारीत संसार, व्यापार किंवा भौतिक सुखांची चर्चा होत नाही, तर आत्मोन्नती आणि ईश्वरभक्तीचा मार्ग शोधला जातो. संतांच्या सहवासातून मिळणारे संस्कार हेच खरे जीवनाचे वैभव आहे. आर्थिक संपन्नता आनुवंशिकतेने मिळू शकते; मात्र संस्कार आणि आध्यात्मिक समृद्धी संतांच्या संगतीतूनच प्राप्त होते. वारी माणसातील अहंकार दूर करून त्याला समतेचा आणि मानवतेचा संदेश देते. व्यक्ती बदलली तर समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करते, हा संदेश वारकरी संप्रदायाने गेली सातशे वर्षे दिला आहे.

वारीतील साधेपणा, शिस्त, परस्पर सहकार्य आणि प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहण्याची वृत्ती हे जीवनमूल्यांचे प्रभावी शिक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. सुख-दुःख समभावाने स्वीकारणे, असुविधेत समाधान मानणे आणि ईश्वरनामात तल्लीन होणे, ही वारीची खरी शिकवण असल्याचेही ते म्हणाले. लंडनमधून सुरू झालेल्या या ‘ग्लोबल वारी’मुळे वारकरी संप्रदायाचे विचार आणि संत साहित्याचा वारसा जगभर पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे. विठ्ठल भक्ती, संत परंपरा आणि भारतीय संस्कृतीचे वैश्विक दर्शन घडविणारा हा उपक्रम वारकरी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

11 देश आणि 50 दिवसांचा अखंड प्रवास

लंडनस्थित 'श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती' आणि अनिवासी भारतीय विठ्ठल भक्तांच्या पुढाकाराने या अनोख्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी केवळ लंडनपुरती मर्यादित नसून ती नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, रोमानिया आणि तुर्की अशा विविध देशांतून मार्गक्रमण करणार आहे. 25 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी थेट पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.

लंडनमध्ये साकारणार भव्य विठ्ठल मंदिर

या वारीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लंडनमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा प्रचार करणे हे आहे. युरोपमधील नवीन पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी आणि जगभरात विश्वशांतीचा संदेश जावा, यासाठी या 'ग्लोबल दिंडी'चे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून विठुरायाचा विचार आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT