Ghodegaon Highway Sewage Problem Pudhari
अहिल्यानगर

Ghodegaon Highway Sewage Problem: घोडेगावात महामार्गाची सांडपाण्याने वाट लागली; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका, ग्रामस्थांचा रास्तारोकोचा इशारा

छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावर चिखल, दुर्गंधी आणि पाण्याचे साम्राज्य; शनिशिंगणापूरच्या भाविकांसह विद्यार्थी, वाहनचालक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

घोडेगाव: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर राज्य महामार्गावर सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

घोडेगावातील एका उपनगरातील सांडपाणी योग्य प्रकारे वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने हे सांडपाणी महामार्गावर येत आहे. सततच्या पाण्यामुळे रस्त्याची झीज होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून, या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ सुरू आहे. शनिशिंगणापूरकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग घोडेगावमधून जात असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविकांची वाहतूक या मार्गावरून होत आहे. मात्र, घोडेगावातील महामार्गाची झालेली दुरवस्था आणि रस्त्यावर साचलेले सांडपाणी बाहेरगावांहून येणाऱ्या भाविकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

घोडेगाव येथे सोमवार, बुधवार आणि शनिवार या तीन दिवशी कांदा मार्केट भरते. त्यामुळे या दिवशी परिसरातील शेतकरी, व्यापारी तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कांदा विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी आणि त्यांची वाहने याच मार्गाचा वापर करतात. त्यातच श्रावण महिन्यातील भाविकांची वाढलेली गर्दी आणि महामार्गावरील खड्डे व सांडपाण्याची समस्या यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

महामार्गालगतच नागरिकांची वर्दळ, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या संख्येने असते. रस्त्यावर साचलेले सांडपाणी, चिखल आणि खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असून, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

सांडपाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महामार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्यावर सांडपाणी येऊन रस्त्याची दुरवस्था होत असतानाही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. केवळ तात्पुरती डागडुजी न करता गटाराची तांत्रिकदृष्ट्या योग्य व्यवस्था करून महामार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून सांडपाण्याची समस्या आणि महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांना दिला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहण्याऐवजी तातडीने कार्यवाही करावी, अशी संतप्त भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT