सोनई: घोडेगाव येथे गुरुवारी (दि 12) टोळीयुद्धात नितीन शिरसाठ याचा गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी शिरसाठच्या पत्नी स्वाती शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव येथील बाजाराचा ठेका घेण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे, तसेच गुन्ह्याच्या वेळी सूरज फुलमाळी हा गुलाब फुलमाळीच्या हातातील पिस्तुलातून गोळी लागून जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुलाब सादिक फुलमाळी, सूरज फुलमाळी, आकाश अण्णा फुलमाळी, कृष्णा यल्लाप्पा फुलमाळी, भारत यल्लाप्पा फुलमाळी (सर्व रा. घोडेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घोडेगाव येथे मोठा पोलिस बंदोबस्त असून, आरसीबी प्लाटून, अहिल्यानगर, श्रीरामपूर, राहुरी, एमआयडीसी व शेवगाव येथून अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याचे समजते.
नगरच्या हॉस्पिटलमध्ये राडा
घोडेगाव येथील गोळीबारातील जखमी सूरज फुलमाळी आणि नितीन शिरसाठ यांना गुरुवारी सायंकाळी शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्या वेळी समोरासमोर आलेल्या दोन्ही जखमींच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्येच राडा केला. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की व मारहाण केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शाहरूख जावेद शेख, मयूर ठुबे, रवी आल्हाट, मदन जाधव व अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यांनी याबाबत फिर्याद दिली. चांगदेव आंधळे तपास करीत आहेत.