‘इन्फनेट बिकन’च्या 12 संचालकांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक  File Photo
अहिल्यानगर

Shrigonda News: ‘इन्फनेट बिकन’च्या 12 संचालकांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 74 लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Infinet Beacon Fraud Case

श्रीगोंदा: इन्फनेट बिकन कंपनीच्या संचालक व एजंट यांनी महिन्याला सहा ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 73 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे(रा. मांदळी, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून सदर कंपनीच्या बारा संचालकांविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीचे संचालक व काही एजंट परागंदा झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नवनाथ औताडे, अगस्त मिश्रा,राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, ययाती मिश्रा, शुभम औताडे, सुवर्ण औताडे, रंगनाथ गलांडे, अनिल दरेकर, संदीप दरेकर, अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अनिल दरेकर व रंगनाथ ऊर्फ पिंटू गलांडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.(Latest Ahilyanagar News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील कंपनीच्या संचालक असलेल्या एजंटने गुंतवणूक केल्यास आम्ही महिन्याला सहा ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष फिर्यादी व नातेवाइकांला दाखवले. त्यामुळे फिर्यादीने ऑक्टोबर 2024 पासून स्वतःच्या तसेच पत्नी व सासर्‍यांच्या नावे टप्प्याटप्प्याने 73 लाख 50 रुपयांची गुंतवणूक केली.

त्यांना त्या बदल्यात 18 लाख 80 हजार 655 रुपयांचा परतावा मिळाला. मात्र, मे महिन्यापासून परतावा मिळाला नाही. त्यावेळी फिर्यादीने एजंट व कंपनीच्या अन्य संचालकांना संपर्क केला. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. कंपनीच्या अनेक संचालकांशी संपर्क करूनही परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे दिसून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल होत असतानाच आणखी एक तक्रारदार पोलिस ठाण्यात आला होता. त्याने यापूर्वीच पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केल्याची माहिती आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे तपास करीत आहेत.

हिरडगाव मुख्य केंद्र

या कंपनीचा मुख्य केंद्रबिंदू हिरडगाव असल्याचे समोर आले आहे. या गावातील शेकडो लोकांनी आर्थिक आमिषापायी या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्याची बाब समोर आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार तपास

दरम्यान, आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातो. या गुन्ह्याचा तपासही आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता आहे.

कोट्यवधी रुपये कमावणारे एजंट गायब

दरम्यान, या कंपनीची सर्व मदार गावोगाव असणार्‍या एजंटवर होती. या एजंट मंडळींनी गावागावामधील लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून वरील कंपनीत टाकले होते. त्या बदल्यात या एजंटांना कमिशन मिळत होते. श्रीगोंदा शहरातील एका एजंटला महिन्याला ऐंशी लाख रुपये कमिशन मिळत होते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कोट्यवधी रुपये कमावणारा हा एजंट कुटुंबीयांसह फरार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT