नगर: शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घातल्याची माहिती असतानाही जादा परतावा देण्याच्या आमिषाला भुललेल्या नगर, श्रीगोंदा, पारनेरसह राज्यातील हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याची चर्चा सुरू आहे.
पुण्यातून सुरू झालेला हा खेळ पारनेर तालुक्यातील सुपा तसेच श्रीगोंदा येथे येऊन पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेअर मार्केटच्या नावाखाली गंडविणार्या मल्टीस्टेटचा भांडाफोड करण्याकरिता श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. (Latest Ahilyanagar News)
एकच मालक असलेल्या व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने वेबसाईट ओपन करत गोरगरीब, शेतकरी तसेच बेरोजगारांना लुबाडण्याचा उद्योग केल्याची चर्चा श्रीगोंदा, पारनेरसह नगर तालुक्यात सुरू आहे. बचतीचे महत्त्व तसेच शेअर मार्केट व गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ग्राहक जाळ्यात ओढले.
संबंधित कंपनीकडून दाखविण्यात आलेल्या विविध आमिषापोटी शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, गोरगरिबांनी आयुष्याची पुंजी संबंधित शाखेमध्ये गुंतविली; परंतु गेल्या काही महिन्यांपासून फसवणूक झाल्याची कुणकुण लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गोरगरीब शेतकरीच नव्हे तर काही पोलिस अधिकारीदेखील संबंधित कंपनीच्या आमिषाला बळी पडल्याची चर्चा आहे. अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी देखील येथे पैसे गुंतवले आहेत. परंतु आता गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदार सांगत आहेत.
संबंधित कंपनीने गावोगाव एजंट नेमून शेतकरी, महिला, बेरोजगार यांना विविध आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अनेक महिलांनी तर जास्तीचे पैसे मिळणार्या अपेक्षेवर घरातील सोने, दागदागिने मोडून पैसे संबंधित संस्थेमध्ये गुंतवले आहेत.
कार्यालयाच्या उद्घाटनावेळी उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक तसेच लोकप्रतिनिधींमुळे अनेक नागरिकांनी संबंधित संस्थेवर विश्वास दाखवला. मोठी गुंतवणूक केली अन् आज सुरू असलेल्या परिस्थितीकडे पाहता पश्चातापाची वेळ आली आहे. श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील सुपा येथे मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.
ग्रामीण भागात घरोघरी हिंडत एजंट लोकांनी विविध आमिष दाखवून शेतकरी, मजूर, बेरोजगार, महिला तसेच व्यावसायिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यापोटी एजंटांना मोठे कमिशन मिळत असल्याची ही चर्चा आहे. गुंतवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांचा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यामध्ये गुंतवणूकदार असल्याची माहिती समोर येत आहे.
बाबासाहेब जगताप यांचा पुढाकार
फसवणूक झालेल्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पोस्ट टाकून फसवणूक झालेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेकडो नागरिकांनी आपली कैफियत जगताप यांच्यासमोर मांडली. काही राजकीय पदाधिकार्यांनी देखील या बाबीचा पर्दाफाश करण्यासाठी जगताप यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
हिरडगावच्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील एका महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेलाही संबंधित कंपनीच जबाबदार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. गुंतवणूक केलेले पैसे बुडाल्याच्या नैराश्यातून या महिलेने विषारी औषध सेवन केल्याची चर्चा तालुक्यात आहे.
मल्टिस्टेट सोसायटी पदाधिकार्यांकडून सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्यात येते असले तरी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. फसवणूक झालेल्या शेकडो लोकांनी कैफियत मांडली आहे. त्यांच्यासाठी लढा उभारणार आहे.
- बाबासाहेब जगताप, संचालक, श्रीगोंदा बाजार समिती