School Food Safety Training Pudhari
अहिल्यानगर

School Food Safety Training: आता शाळांना ‘फसाई’ नोंदणी बंधनकारक; तुकाराम मुंडेंचा पोषण आहारावर वॉच

अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, अहिल्यानगर आणि मनपा अहिल्यानगर या ठिकाणी दि. 21 ते 24 या कालावधीत हे प्रशिक्षण होईल.

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक व संतुलित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तालुकास्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, आज शुक्रवारपासून तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले जाणार असून, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भडारी यांनी तसे आदेश दिले आहेत.

अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, अहिल्यानगर आणि मनपा अहिल्यानगर या ठिकाणी दि. 21 ते 24 या कालावधीत हे प्रशिक्षण होईल.

14 तालुक्यांमध्ये 4527 पेक्षा अधिक शाळा असून, इयत्ता पहिली ते पाचवीचे 2 लाख 59 हजार, तर सहावी ते आठवीचे 1 लाख 69 विद्यार्थी शालेय पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शासकीय शाळांसह, खासगी शाळा व अंगणवाडीतून दिला जाणारा आहार स्वच्छ, पौष्टीक व संतुलित असावा, यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

त्यासाठी त्यांनी आपल्या विभागाकडून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी त्याचे नियोजन केले आहे. तर पीएम पोषण आहारचे लेखाधिकारी रुपेश भालेराव यांनी सर्व प्रशिक्षणांर्थींना याबाबत सूचना केल्या आहेत.

कोण देणार प्रशिक्षण ?

अकोले व संगमनेर येथे उ. र. सूर्यवंशी, कोपरगाव व राहाता येथे कि. ध. जगदाळे, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव व पाथर्डी येथे उज्ज्वला पाटील, तर जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व अहिल्यानगर येथे प्रदीप पवार, मनपा अहिल्यानगर येथे मुल्ला हे अधिकारी प्रशिक्षण घेणार आहेत.

प्रशिक्षण कोणासाठी असेल?

मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी, अधीक्षक (पीएम पोषण), गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व गटविकास अधिकारी यांचा प्रशिक्षणात सहभाग राहणार आहे.

नेमकी काय प्रशिक्षण देणार?

सर्व शाळांना आता ‘फसाई’ नोंदणी परवाना बंधनकारक असणार आहे. शाळेतील जंकफूड अन्न पदार्थावर बंदी, स्वच्छता व आरोग्याबाबत काळजी, इशारा फलक व विद्यार्थी, पालकांमध्ये जागरुकता, पोषण विषय मानके व त्याचे पालन, शाळा व्यवस्थापन समिती यांची भूमिका, ईट राईट स्कूल उपक्रम, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक व संतुलित अन्न उपलब्ध करून द्यावे, यासाठी सीईओंच्या सूचनेनुसार, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारपासून तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱी हे प्रशिक्षण देणार असून, प्रशिक्षणानंतरचा अहवाल सीईओंना दिला जाणार आहे.
- रुपेश भालेराव, लेखाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT