Flood Relief Donation Pudhari
अहिल्यानगर

Flood Relief Donation: १५ टन पशुखाद्य, १० हजारांसाठी कपडे; ‘घर-घर लंगर’ची पूरग्रस्तांना मोठी मदत

३ गावांसाठी औषधांचा पुरवठा; विद्यार्थ्यांना साहित्य, कुटुंबांना भांडी वाटप

पुढारी वृत्तसेवा

नगर : तब्बल 15 टन पशुखाद्य, 10 हजार व्यक्तींसाठी कपडे, 200 कुटुंबीयांना गृहोपयोगी भांडी, 100 विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य आणि 3 गावांना पुरेल इतकी प्राथमिक उपचारांच्या औषधांचे किट्स.. ही सगळी सामग्री अहिल्यानगर आणि पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या पूरस्थितीत तेथील रहिवाशांना पुरवली आपल्या अहिल्यानगरमधल्याच श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे...

श्री गुरू अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर-घर लंगर सेवेच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या सर्वसमावेशक मदत उपक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या सर्व मदतीत नगरकरांनीही मोठा हातभार लावला असल्याचे आयोजकांनी सांगितले. गुरु तेग बहादुरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या 350 वर्षांच्या स्मृतिदिनी या उपक्रमाची सांगता करत शहरातील गोशाळांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले.

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शहरातील विविध गोशाळांना पशुखाद्याचे वितरण करण्यात आले. तारकपूर येथील घर-घर लंगर सेवेच्या अन्नछत्रालयात आयोजित कार्यक्रमात जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंग धुप्पड, अमोल गाडे, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, मुन्ना जग्गी, प्रशांत मनोत, जय रंगलानी, कैलाश नवलानी, सोमनाथ चिंतामणी, सुनील थोरात, जगजीतसिंग गंभीर, राजू जग्गी, अनिश आहुजा, राजा नारंग, संजय आहुजा, किशोर खुराणा, प्रीतमसिंग धीलो तसेच माऊली गोशाळेचे प्रसाद शेंडे आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप या वेळी म्हणाले की, शीख धर्मातील नववे गुरू गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या बलिदानाचा धगधगता इतिहास प्रेरणादायी आहे. घर-घर लंगर सेवेने कोरोना काळात भुकेल्यांच्या सेवेसाठी अपार परिश्रम घेतले; ही सेवा आजही तितक्याच ताकदीने कार्यरत आहे. संकटाच्या प्रत्येक काळात श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान समाजाच्या पाठीशी उभा राहतो, ही लंगर परंपरेची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून घर-घर लंगर सेवा भुकेल्यांना अन्न, गरजू कुटुंबांना धीर आणि संकटात लोकांना साथ देत सतत कार्यरत आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीची सांगता करताना, गुरु परंपरेचा सेवा-समर्पणाचा संदेश देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT