श्रीरामपूर: अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने २ जून रोजी काढलेला जीआर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. सदर जीआरच्या आधारे राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, म्हणणाऱ्या सरकारने सदर जीआरच्या माध्यमातून अप्रत्यक्ष शेतकऱ्यांची वसुलीचा जीआर काढला आहे. त्यामुळे तालुक्यातील माळेवाडी येथे कर्जमाफीच्या जीआरची नुकतीच होळी करण्यात आली. आता प्रत्येक गावात होळी करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
यावेळी शेतकरी संघटनेच्या माळेवाडी शाखाध्यक्ष दिलीप औताडे, शैलेश वमने, दिलीप औताडे, साहेबराव चोरमल, कडू पवार, सतीश नाईक, दिगंबर औताडे, जालिंदर औताडे, बाबासाहेब औताडे, देविदास वमने, दादासाहेब जाधव, योगेश वमने, बबन औताडे, सिताराम औताडे, सोसायटी सदस्य भरत वमने, प्रकाश ढोबळे, विलास औताडे, बाबासाहेब औताडे, राजाराम औताडे, विलास गोरे, सतीश गायकवाड, कृष्णा औताडे, कल्याण बहिरट, दिलीप सरोडे, सोन्याबापू औताडे, बाबासाहेब औताडे, दगू मोहन, राधूजी मोहन, सुनिल पवार, बाळासाहेब निकम, किशोर मोहन व ज्येष्ठ शेतकरी हरिभाऊ ताकेसह शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी औताडे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची सदर जीआरच्या आधारे फसवणूक झालेली आहे. शेतमालाला मागील वीस वर्षांपासून उत्पादन खर्च भरून निघेल इतका दर मिळालेला नाही. सरसकट कर्जमाफी योजना आणणे गरजेचे होते. परंतु दुर्दैवाने कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी व सुखकर जीवन जगण्यासाठी अशा प्रकारची कर्जमुक्ती योजना आणलेली नाही.
फडणवीस सरकारने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाने निकष, अटी व शर्ती लादून कर्जमुक्ती योजना आणली होती. सदर योजनेतही जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पाच लाख नऊशे कोटी रुपयांना वंचित राहावे लागले. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या एकमेव मागणीसाठी सातत्याने आंदोलने छेडली गेली. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप फारसा लाभ मिळालेला नाही.
१ जुलै पासून रस्त्यावर उतरणार
क्षेत्राची रकमेची व तारखेची अट न लावता सातबारा कोरा करावा, अन्यथा याबाबत जनजागृती करण्यासाठी ३० जून पर्यंत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गाव तेथे कर्जमुक्ती योजनेच्या फसव्या जीआरची होळी करण्यात येईल. १ जुलै पासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला.
आज स्वाभिमानीचे आंदोलन
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शासनाने आदेशातील जाचक अटी शर्ती रद्द कराव्यात आदी मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटन्येच्या वतीने आज सोमवारी (दि.१५) तारखेला सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात शांततेत आंदोलन करुन निवेदन देणार असल्याची माहिती जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी पत्रकाद्वारे दिली. त्यामुळे या आंदोलनात तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.