राहुरी: मुळा धरण तटालगतचा वीज पुरवठा खंडित केल्याने काल गुरुवारी ‘नगर-मनमाड’वर रस्ता रोको आंदोलन करीत शेतकर्यांनी संताप व्यक्त केला. जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत करणार नाही, तो पर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा पावित्रा आंदोलकांनी घेतल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकार्यांशी सकारात्मक चर्चा घडवून आणली. अखेर महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देताच शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले.
मुळा धरणाच्या काठालगतच्या अतिदुर्गम गावातील शेतकर्यांचे वीज रोहित्र 15 दिवसांपासून बंद करत महावितरण विभागाने सुरू केलेली सक्तीची वील बील वसूल मोहिम विरोधात काल गुरुवारी (दि.17)रोजी सकाळी 11.30 वाजता राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील नगर-मनमाड रस्त्यावर शेतकरी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन केले. (Latest Ahilyanagar News)
याप्रसंगी सर्व शेतकर्यांनी गट, तट व पक्ष बाजुला ठेवत एकत्रित येत वज्रमुठ दाखवून दिली. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार असूनही महावितरणने आडमुठी भूमिका घेतल्याने आंदोलकांनी वीज पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे सांगितले.
तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यानंतर प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती. अखेरीस पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकारी व आंदोलकांमध्ये समन्वय साधला. याप्रसंगी ज्ञानेश्वर बाचकर, रामदास बाचकर, प्रकाश देठे, विजय तमनर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, वर्षाताई बाचकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महावितरण विभागाच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला.
जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. अटक झाली तरी चालेल मात्र रस्त्यावरून हटणार नसल्याचा ईशारा आंदोलकांनी दिला. यावेळी सरपंच प्रभाकर गाडे, खंडू केदारी, आण्णासाहेब खिलारी, काशिनाथ डव्हाण, सुनिल खिलारी, शिवाजी खिलारी, बाबासाहेब ढाकणे, बाबासाहेब वडितके, योगेश सांगळे, सुभाष आघाव, दत्तात्रय आघाव, सतिष बाचकर, बाबासाहेब कोळसे, पोपट खिलारी, महशे हापसे, गणेश बाचकर, संदिप बाचकर, बाबासाहेब कोळसे, दीपक कुदनर, सुभाष आघाव, अमोल येळे, राजेंद्र खिलारी, संजय झावरे, गोवर्धन हापसे, प्रेमराज येळे आदींची उपस्थिती होती.
वीजप्रश्नी असा निघाला तोडगा
पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी आक्रमक झालेल्या आंदोलकांना शांत करत महावितरणच्या वरिष्ठांशी संपर्क साधून दिला. महावितरणचे तालुका अधिकारी विरेश बारसे यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला. अखेरीस महावितरणने शेतकर्यांची मागणी मान्य केली. सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करू. तीन महिन्यात वीज बिल अदा करण्याची मुभा देण्यात आली. दोन टप्यामध्ये शेतकर्यांनी वीज बिल अदा करावे असे आवाहन महावितरणच्या अधिकार्यांनी केले. आंदोलकांनी माघार घेतल्यानंतर सुमारे दोन तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला.
पाणी डोळ्याने दिसतंय पण शेतीला मिळेना- वर्षाताई बाचकर
वर्षाताई बाचकर यांनी सांगितले की, धरण काठालगतच्या लोकांची परिस्थिती महावितरणने बिकट केली आहे. वीज पुरवठा खंडित केल्याने धरण उधाला व कोरडा घशाला ही म्हण आम्हाला लागू करत महावितरणने सुलतानी भूमिका घेतली. शेतकरी एकत्र आल्यास काय होते ते दाखवून दिले असल्याचे बाचकर यांनी सांगितले.
सत्तेची मस्ती थांबवा: प्रकाश देठे
शेतकर्यांची अवस्था पूर्वीच वाईट असताना महावितरणने आडमुठी भूमिका घेतली. हिंदुत्वाचे असल्याचे सांगत सत्ताधारी सत्तेची गुर्मी दाखवत आहे. हिंदू-मुसलमान द्वेष निर्माण करणार्यांना शेतकर्यांची अश्रृ दिसेनासे झाले आहे. आता शेतकर्यांनी सत्ताधार्यांना चढलेली सत्तेची मस्ती उतरवण्याची वेळ आली असल्याचे प्रकाश देठे यांनी सांगितले.
शेतकर्यांना फसवणारेच सत्तेवरः रविंद्र मोरे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे यांनी शासन विरोधात संताप व्यक्त करीत शासनाच्या कृषी विरोधी धोरणाचा निषेध केला. कर्जमाफीची फसवी घोषणा करीत सत्ताधार्यांनी सत्ता मिळवली आहे. निवडणुकीतील आश्वासनांचा विसर पडलेल्या राज्य शासनाला सत्तेची मस्ती चढली आहे. स्वामिनानथ आयोगाला पायदळी तुडवत शेतकर्यांना कर्जाच्या खाईत लोटणार्या सत्ताधार्यांना जागा दाखवून देण्यासाठी शेतकर्यांनी वज्रमुठ बांधावी, असे आवाहन मोरे यांनी केले.
शेतकर्यांचा अंत पाहू नका: विजय तमनर
पावसाने उघडिप घेतल्याने खरीप पीके कोमेजली आहे. त्यातच महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकर्यांचा लाखो रुपये खर्च वाया जात आहे. शेतकर्यांना संकटात टाकणार्या सत्ताधार्यांनी अंत पाहू नये असा ईशारा यशवंत सेनेचे विजय तमनर यांनी दिला.