

नगर: महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्यांच्या बाबतीत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेला खुलासा हास्यास्पद असून, ठाकरे शिवसेना त्यांना सर्व पुरावे दाखवून त्यांचा अभ्यास वर्ग घेण्यास तयार आहे. आयुक्तांनी मनपाच्या प्रांगणात असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावे, त्यांना पुराव्यानिशी भ्रष्टाचार दाखवून द्यायला तयार आहे, असे जाहीर आव्हान शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांनी दिले.
किरण काळे यांनी रस्ता घोटाळ्याच्या तक्रारी दिल्या आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. यावर मनपा आयुक्त डांगे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत तशी तक्रारच नसल्याचा खुलासा केला होता. (Latest Ahilyanagar News)
काळे म्हणाले, मी 8 मे 2023 ला पहिले पत्र याबाबत मनपा आयुक्त यांना दिले होते. त्यानंतर 15 मे, 22 मे, 23 ऑगस्ट 2023, 14 जुलै 2025 अशी एक नाही तर अनेक पत्रे दिली आहेत. मला मनपाने 25 मे, 26 मे, 29 मे, 31 मे 2023 अशा अनेक वेळा, कधी अतिरिक्त मनपा आयुक्त, तर कधी उपायुक्त यांच्या समितीची नेमणूक चौकशीसाठी केल्याचे लेखी कळवले आहे. मी जिल्हाधिकार्यांच्या दालनासमोर या घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा 2023 मध्ये दिला होता.
त्यावर मला 31 मे 2023 ला आयुक्तांच्या मान्यतेने उपायुक्त, शहर अभियंता मनोज पारखे, अभियंता निंबाळकर यांनी दीड महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. एवढे सगळे सुरू असताना आयुक्त म्हणतात, की अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. घोटाळा झालेला नाही.
दरम्यान, शिवसेनेने नेते संजय राऊत हे या देशाच्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे खासदार आहेत. त्यांना राजकीय उत्तर देणार्या आयुक्तांवर हक्कभंग का आणला जाऊ नये? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.