

राहुरी: राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे राहुरी शहराध्यक्ष अध्यक्ष सुनील भट्टड यांच्या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत, राज्य सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी, भट्टड यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा खासगी सहाय्यक आहे,’ असे सांगत, भट्टड यांनी महिलांशी संवाद साधून, त्यांची फसवणूक केली आहे, अशा आशयाचे पत्र राज्य महिला आयोगाने पाठवून, अहिल्यानगर पोलिस प्रशासनाला गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले होते. (Latest Ahilyanagar News)
राहुरी शहरातील सुनील भट्टड नामक व्यक्तीच्या कार्यालयामधे 2014 साली राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भेट दिली होती. यामुळे भट्टड यांची अजित पवारांसह राष्ट्रवादींच्या नेत्यांशी जवळीक आहे, अशी चर्चा सुरु होती, परंतू नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा खासगी सहाय्यक आहे,’ असे सांगणारे भट्टड यांचे, महिलांसमेवत संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग महिला आयोगाच्या हाती लागले आहे. याबाबत महिला आयोगाने तत्काळ जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाला पत्र पाठविले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, सुनील भट्टड यांनी, रूपाली चाकणकर यांचा खासगी सहाय्यक आहे, असे खोटे सांगून, लोकांची दिशाभूल व फसवणूक केली आहे. ही माहिती एका कॉल रेकॉर्डिंगद्वारे प्राप्त झाली आहे. कॉल रेकॉर्डिंगमध्ये भट्टड यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या नावाचा गैरवापर करून, इतरांना फसविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे.
कॉल रेकॉर्डिंगमध्ये असेही स्पष्ट आहे की, दोन महिलांपैकी शिरसाट या स्वतःला जळगाव येथील महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्याचे सांगून, इतरांची फसवणूक करीत आहेत, परंतू महिला आयोगाने याबाबत स्पष्ट केले आहे की, सुनील भट्टडसह दोन महिलांचा महिला आयोगाशी कुठलाही अधिकृत संबंध नाही.
त्यांची कुठल्याही पदावर नियुक्ती करण्यात आली नाही. अशा चुकीच्या कृतींमुळे महिला आयोगासह अध्यक्षांची प्रतिमा मलिन होत आहे. सर्वसामान्यांची फसवणूक होण्याचा शक्यता आहे. याप्रकरणाची तत्काळ चौकशी करून, न्याय संहिता 2023 अंतर्गत 318 व कलम 319 अन्वय्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 व इतर कायद्यांन्वय्ये गुन्हा दाखल करून, कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र महिला आयोगाने पाठविले होते.
राहुरीच्या राजकारणात रंगली खमंग चर्चा!
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून राज्य सरचिटणीस गर्जे यांनी, राहुरीचे शहराध्यक्ष अध्यक्ष सुनील भट्टड यांना, पक्षाच्या नावाचा गैरवापर करू नये, असे सूचित केले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राहुरीच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे