Fake Milk Racket Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Fake Milk Racket: देवळाली प्रवरा बनावट दूध रॅकेट उघड! एका लिटर क्रिमपासून 20 लिटर दूध; 34 आरोपींचा पर्दाफाश

पॅराफिन, केमिकल व मिल्क क्रिमच्या मिश्रणातून तयार होत होते बनावट दूध; राहुरी-जामखेडसह जिल्ह्यात मोठा जाळा उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

नगर: जामखेड तालुक्यातून एलसीबीने जप्त केलेल्या बनावट दुधाचा उगम देवळाली (ता. राहुरी) येथून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. भाडोत्री जागेत बनावट दूध बनविण्यासाठी घातक क्रिम तयार करण्याचा ‌‘उद्योग‌’ सुरू होता. एक लिटर क्रिमपासून 20 लिटर दूध तयार करण्याचे आमिष दाखवत राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यात क्रिम (केमिकल द्रावण) चा पुरवठा सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात सुमारे 34 आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, यापूर्वीच तिघांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व अन्न-औषध प्रशासन विभागाच्या पथकाने 14 फेब्रुवारी रोजी फक्राबाद (ता.जामखेड) येथे छापा घालून क्रिमपासून बनवलेले दूध पकडले तर, तिघांना ताब्यात घेतले होते. समीर कमरूद्दीन शेख (रा.उंबरे,राहुरी), आफताब कलीम शेख (रा.शुक्लेश्वरचौक,राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (रा. फक्राबाद) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

उपनिरीक्षक समीर अभंग यांनी केलेल्या तपासात बनावट दूध बनविण्यासाठी केमिकल, पावडर पुरविणारे तसेच संगनमताने केमिकलचे मिश्रण तयार करून क्रिम तयार करणारे आणि त्याची जिल्ह्यात विक्री करणाऱ्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. तपासात आरोपी समीर शेख व अफताब शेख यांनी देवळाली प्रवरा येथे भाडोत्री जागेत बनवाट दूध बनविण्याचा छोटा कारखाना सुरू केला होता. तिथे पॅराफिन (मिनरल ऑइल), 9.5 नावाचे केमिकल, मिल्क क्रिम व पाण्याचे एकत्रित मशिनमध्ये मिश्रण करून क्रिम (केमिकल द्रावण) तयार केले जात होते. देवळली येथे तयार केलेली क्रिम (केमिकल द्रावण) शाकीर शेख, सद्दाम शेख, चंद्रकांत बर्डे, सुनील ढोकणे, राजू ढोकणे हे जिल्ह्यात विक्री करीत होते. पोलिसांनी देवळाली प्रवरा येथील कारखान्यावर छापा घातला त्यावेळी तेथील मशिनरी आरोपींच्या साथीदारांनी अगोदरच गायब केली होती. ते आरोपीचे जवळचे नातेवाईक असून त्यांनाही गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले आहे.

दारात नाय गाय पण, कॅनात साय

दूध डेअरी चालकांसह शेतकऱ्यांकडेही बनावट दूध बनविण्याची क्रिम केल्याचे तपासात समोर आले आहे. ज्या शेतकऱ्याच्या दारात एकही गाय, म्हैस नाही अशाही शेतकऱ्यांकडे 150 लिटर दूध असल्याचे उघड झाले आहे. ज्याच्याकडे शेती आणि जनावरेही नाहीत, असे लोक बनावट दूध तयार करून बाजारात विक्रीसाठी आणत असल्याचे समोर आले आहे.

बनावट दुधाची फॅट अन्‌‍ फॅक्ट

साधारण दुधामध्ये फक्त फॅट व डिग्री तपासली जाते. फॅट व डिग्री चांगली असल्यास डेअरी चालक दूध खरेदी करतात. गुन्ह्यातील मुख्य आरोपी बनावट दूध तयार करण्याची पद्धत संबंधित समजून सांगत होते. त्यानुसार अन्य क्रिमपासून बनावट दूध तयार केले जात होते. पॅराफिनमुळे फॅट वाढते आणि वे नावाच्या पावडरमुळे डिग्री वाढते. त्यामुळे सहजा सहजी कोणाच्याही लक्षात येत नाही. 9.5 नावाचे केमिकल सर्व पदार्थांना घट्ट (एकत्रित) ठेवते. त्यामुळे बनावट दूध आणि अस्सल दूध लक्षात येत नाही.

असे तयार होते बनावट दूध

पॅराफिन (मिनरल ऑइल), 9.5 नावाचे केमिकल, मिल्क क्रिम आणि पाण्याचे मशिनमध्ये एकत्रित मिश्रण करून घातक क्रिम (केमिकल द्रावण) तयार केले जाते. साधारण एक लिटर क्रिम वीस लिटर पाण्यात टाकली जाते. त्यापासून वीस लिटर दूध तयार केले जाते आणि ते दूध विक्रीसाठी बाजारात आणले जाते, असे तपासात समोर आले आहे.

दुधाचा काळ्या धंद्यातील बोके

आकाश मिश्रा, विजय मिश्रा, अरूण पाठक (रा. भिवंडी, मुंबई), जगदाळे (पूर्ण नाव नाही. रा.नेवासा फाटा), हरिदास गोपाळघरे (रा.जामखेड), गांधी (पूर्ण नाव नाही, रा.केडगाव), के.के.फुड्स (रा.तारकपूर, अहिल्यानगर), शाकिर शेख, सद्दाम शेख, चंद्रकांत बर्डे (तिघेही रा.राहुरी), सुनील ढोकणे, राजू ढोकणे (दोघे रा.उंबरे,राहुरी), रंगनाथ ढूस (रा.देवळाली प्रवरा), नामदेव कोहोकडे (रा.राहुरी), सतीष पठारे, दत्तात्रय करांडे, दत्तात्रय कराळे, महेश मोकाटे (तिघेही रा.अहिल्यानगर), शामराव माने (रा.आष्टी,बीड), दत्ता शिंदे (रा.पाटोदा,बीड), नितीन केकाण (रा.निफाड,नाशिक), राहुल पवार (रा.मालुंजे खुर्द,राहुरी), संजय गुंड (रा.बीड), अनिल साळवे (रा.जोशी वस्ती,श्रीरामपूर), बाजीराव क्षीरसागर (रा.विंचुर,नाशिक), किरणकुमार रोहकले (रा.वार्ड नंबर 3,श्रीरामपूर), अनिकेत दरंदले (रा.नेवासा), लक्ष्मण करंजुले (रा.पारनेर), वैभव हांडे (रा.जुन्नर,पुणे), मनीष पटेकर, गौरव पटेकर (दोघेही रा.राहुरी) यांचे नावे निष्पन्न झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT