नुकसानीची पाहणी म्हणजे पर्यटन दौरेमाजी महसूलमंत्री थोरात यांची मंत्री विखेंवर टीका Pudhari
अहिल्यानगर

Thorat criticizes Vikhe: नुकसानीची पाहणी म्हणजे पर्यटन दौरे; माजी महसूलमंत्री थोरात यांची मंत्री विखेंवर टीका

थोरात यांनी शनिवारी (दि. 27) तालुक्यातील विविध गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री नुकसानग्रस्तांना आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे कोणतेही आश्वासन देत नसून ते केवळ फोटोसेशन व पर्यटन करण्यासाठी येत असल्याची टीका माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

थोरात यांनी शनिवारी (दि. 27) तालुक्यातील विविध गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या नंतर माजी नगरसेवक बंडुपाटील बोरुडे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आ. हेमंत ओगले, सचिन गुजर, शिवशंकर राजळे, बंडूपाटील बोरुडे, नासीर शेख, सुभाष केकाण, माऊली केळगंद्रे उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)

थोरात म्हणाले की, कधी नवे एवढी अभूतपूर्व परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पिकाच्या नुकसानीसह शेतातील मातीही वाहून गेल्याने अनेक शेतात आता दगडगोटे पाहावयास मिळत आहेत. अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. पशुधनाचे मोठे नुकसान होऊन कित्येक दुभती जनावरे व कित्येकांचे संसार वाहून गेले आहेत.

व्यापाऱ्यांचेही एकीकडे मोठे नुकसान झाले असताना शेतकरीही प्रचंड अडचणीत आला असल्याने या परिस्थितीत सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, दिलासा देण्याचे सोडून सरकार काहीतरी लपवत आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पीकविमा मिळाला नाही. शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होत चालली असताना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नाही. नुकसानीचीच पाहणी करायला आलेले मंत्री लोकांशी संवाद न साधता तसेच निघून जात आहे. यावर सरकारने ठाम भूमिका घ्यायला हवी असे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात पाहणी करायला येणार असे सांगितले जात आहे. ते आले तर त्यांनी भरीव मदत द्यायला हवी. अनेक नवीन रस्त्यांची कामे करताना रस्त्यावरील पूल चुकीच्या पद्धतीने बांधल्याने अनेकांच्या शेतात पाणी गेले आहे.

राज्यातील धाराशिव, सोलापूरसह मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून, हा पाऊस म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस आहे. उसासारखे दमदार पीकही या पावसाने भुईसपाट झाले आहे. तालुक्यातील तिसगाव येथील अनेकजण अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडले असताना त्यांची घरे पाडण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT