

नगर तालुका: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात शनिवारी (दि. 27) दुपारी हल्ला झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव पसरला होता.
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते चालले होते. अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते नाश्ता करण्यासाठी थांबले होते. पुढे जात असतानाच त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. (Latest Ahilyanagar News)
हाके यांना काही झालेले नाही. परंतु मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी गोरख दळवी, संभाजी सप्रे, गणेश होळकर या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी हाके पुण्याहून पाथर्डीकडे चालले होते. अरणगाव परिसरातील हॉटेलवर ते चहा-पाणी व नाश्त्यासाठी थांबले होते. पुढे जात असतानाच पावणेबाराच्या सुमारास हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती तयारी झाली होती. हाके यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हाके यांचा ताफा बाह्यवळण रस्त्याने सोलापूर रोडकडे रवाना झाले. दरम्यान, हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत तिघांना ताब्यात घेतले आहे.