‘वीज वितरण’चे पेट्रोलिंग Pudhari News Network
अहिल्यानगर

Akole News : अकोल्यात ‘वीज वितरण’चे पेट्रोलिंग कागदावरच!

अधिकारी-कर्मचार्‍यांकडून चालढकल शेतकरी; वीज ग्राहकांना बसतोय फटका

पुढारी वृत्तसेवा

अकोले : वीज वितरण कंपनीमार्फत वर्षातून किमान तीनदा सर्व विद्युत वाहिन्यांचे पेट्रोलिंग करणे बंधनकारक आहे, परंतू अकोलेसह राजूर येथील ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चालढकल धोरणासह अनास्थेमुळे पेट्रोलिंग केले जात नाही. कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या निष्पाप जिवास मुकावे लागते, हे मात्र निश्चित!

अकोले तालुक्यात राजुर व अकोले शहरात महावितरण वीज कंपनीचे कार्यालय आहे. समशेरपूर, कोतुळ, भंडारदरा, कोहणे, देवठाण, वारंघुशी, खिरविर, बाम्हणवाडा, मवेशी, पाचनई, कुमशेत,बदगी बेलापूर, कळस, डोंगरगाव, मेहदुरी, कोभाळणे, शेणित,देवगाव, सावरकुठे, तिरडा, पाचपट्टा, धामणगाव पाट, आंभोळ, पैठण, खडकीसह अकोले शहरात वीज वितरण कंपनीचे पेट्रोलिंग होताना दिसत नाही. परिणामी या चालढकलपणाचा मोठा फटका शेतकर्‍यांसह छोट्या- मोठ्या वीज ग्राहकांना बसताना दिसत आहे. ‘उष्णतेचा कहर, त्यात घरगुती विजेचा खेळखंडोबा,’ हा विषय आता नित्याचाच झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

दुसरीकडे वीज भारनियमनाचा फटका पिकांना बसत आहे. विद्युत खांब, फ्यूज पेट्या, ट्रान्सफॉर्मरसह केबल लाईनची ठिक-ठिकाणी अक्षरशः वाट लागलेली दिसते. खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे, विद्युत वाहिन्या, पोल व ट्रान्स्फॉर्मरची कटाक्षाने तपासणी करणे, हे काम करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कर्मचार्‍यांवर आहे, मात्र या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक केली जात आहे. याप्रश्नी अकोले व राजुर ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचार्‍यांमधील समन्वयाचा अभाव आहे, अशी चर्चा झडत आहे.

वीज ग्राहकांच्या तक्रारींकडे डोळेझाक!

सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. पिकांना वेळेत पाणी न मिळाल्याने अक्षरशः करपत आहेत. शेती पंपांना दिलेल्या 8 तासात अनेकवेळा तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना घडतात, मात्र गंभीर प्रश्नाचे वीज कर्मचार्‍यांना सोयरसुतक नसते. बिघाडात वाया गेलेला वेळ पुढे वाढवून दिला जात नसल्याने शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांविषयी संताप व्यक्त करण्याशिवाय अन्य पर्यायच नसतो. अनेक ठिकाणी जीर्ण व लोंबकळणार्‍या विद्युत वाहिन्या, गंजलेल व वाकलेले खांब शेतशिवारात दितात. याप्रश्नी वीज ग्राहकांसह शेतकर्‍यांनी तोंडी- लेखी निवेदने देवून, तक्रारी करूनही अकोले व राजूर वीज वितरण कंपनीचे अधिकारी तक्रारींबद्दल बेदखल असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अधिकारी नाचवितात कागदी घोडे!

वर्षातून किमान तीनदा सर्व प्रकारच्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करून, जीर्ण झालेले घटक बदलणे, ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल बदलणे, खांबाभोवती सुरक्षित तार लावणे, फ्यूज पेट्यांना सुरक्षित झाकण बसविणे, लोंबकळणार्‍या विद्युत वाहिन्यांना उंचीवर ठेवून, त्यांना ताण देणे याबाबी पेट्रोलिंगद्वारे पूर्ण केल्या जातात, परंतू ‘महावितरण’कडून जागेवरच्या पेट्रोलिंगला सोयीस्कर बगल दिली जात आहे. वातानुकूलित कार्यालयात बसून, पेट्रोलिंग पूर्ण केल्याचे कागदी घोडे नाचविले जात आहेत. परिणामी या बेफिकिरीमुळे विद्युत वाहिन्या एकमेकांवर घासल्याने पिके जळाल्याने शेतकर्‍यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT