

Ahilyanagar Shivsena uddhav balasaheb thackrey
नगर : शिवसेना ठाकरे गटाला स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. त्यासाठी दक्षिण आणि उत्तरेतील दोन्ही जिल्हाप्रमुखांना पदावरून दूर करतानाच, त्या ठिकाणी युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी चाचपणी सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. दरम्यान, पक्षनेतृत्वाविषयी नाराजी वाढताना दिसत आहे. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नगरच्या शिवसैनिकांमध्ये मोठा उद्रेक पहायला मिळू शकतो, अशी चर्चा आहे.
नगर जिल्ह्यात तसेच शहरातही एकेकाळी शिवसेनेची मोठी ताकद होती. मात्र स्व.अनिल राठोड यांच्यानंतर ती कमी कमी होत गेली. पक्षातील फुटीनंतर दक्षिणेत प्रा. शशिकांत गाडे तर उत्तरेत पै.रावसाहेब खेवरे यांनी पक्ष जिवंत ठेवला. लोकसभेला दक्षिणेत मविआचे नीलेश लंके यांना खासदार करण्यात गाडेंसह शिवसैनिकांनी मोठे योगदान दिले. तर उत्तरेत शिर्डी लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी खेवरे यांच्यासह त्यांच्या टीमने जीवाचे रान केले. या दोन्ही मविआने जागा जिंकल्या. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत मात्र शिवसेनेच्या नेवासा व श्रीगोंदा मधील दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला.
राहुरीच्या जागेवर खेवरे यांनी दावा केला होता, श्रीरामपूरची जागाही शिवसेनेला द्यावी, असा सूर होता. संगमनेर, अकोले, कोपरगावातही पक्षाच्या इच्छुकांनी तयारी केली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने मविआ धर्म पाळण्याच्या नादात नेवाशाची आहे ती जागा पदरात पाडून घेत इतर ठिकाणी शिवसैनिकांना थांबण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे पारनेरची जागा संदेश कार्ले यांच्यासाठी सेनेला मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र तेथे सेनेने माघार घेतली. त्यानंतर प्रा.गाडे यांच्यासाठी किमान नगरची जागा घ्यावी, असा शिवसैनिकांचा आग्रह होता. मात्र तिथेही नगर सोडून श्रीगोंद्याची जागा घेण्याचा संजय राऊत यांनी अट्टहास केला. त्यामुळे शिवसैनिक दुखावला होता. श्रीगोंद्यातील अनुराधा नागवडे, पारनेरमधून राणीताई लंके, राहुरीतून प्राजक्त तनपुरे यांचा पराभव हा याच नाराजीची धग होती का, ही चर्चाही लपून राहिलेली नाही.
पुढे, संदेश कार्ले, शरद झोडगे, रामदास भोर, डॉ.दिलीप पवार यांच्यासह काही नगरसेवकांनीही मशाल खाली ठेवून शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण उचलला आहे. त्यामुळे नगरमध्ये ठाकरे गटाची वाताहत सुरू आहे.
उत्तरेतील कार्यकर्त्यांनी जुनीच कार्यकारिणी कायम ठेवावी, अशी मागणी खा. वाकचौरे यांच्याकडे केली आहे. त्यांनीही कार्यकर्त्यांना आश्वासित केल्याचे समजते. तर दुसर्या गटाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन जिल्हाप्रमुख पदासाठी खा. वाकचौरे यांनी मातोश्रीवर काही नावे पाठविले असल्याचेही सांगितले. त्यामुळे या प्रक्रियेत खा. वाकचौरे यांनी लक्ष घातल्याचे दिसते.
अगोदरच पक्षाची वाताहत त्यात असे बदल झाल्यास‘ स्थानिक स्वराज्य’चे अवघड होईल, अशी भिती शिवसैनिकांनी व्यक्त केली जात आहे. यातून प्रसंगी राजीनामास्त्र बाहेर येण्याची शक्यता आहे. उत्तरेत जिल्हाप्रमुख पदासाठी सचिन कोते, भरत मोरे, मुकूंद सिनगर, संजय फड, संजय शिंदे अशी अनेक नावे रेसमध्ये आली आहेत. तर दक्षिणेतून संदेश कार्ले यांचे एकमेव नाव होते, मात्र ते शिंदे गटात गेल्याने आता नवा व सक्षम चेहरा शोधावा लागणार आहे.
उत्तरेत सध्या रावसाहेब खेवरे हे एकमेव जिल्हाप्रमुख आहेत. तर दक्षिणेत शशिकांत गाडे आणि राजेंद्र दळवी हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. आता नव्या रचनेत उत्तरेलाही दोन जिल्हाप्रमुख दिले जाऊ शकतात, असे समजते.
विधानसभेला काही प्रमुख नेत्यांनी काम केले नाही, असे गंभीर आरोप आणि काही सत्कारांचे फोटो अशी माहितीही मातोश्रीपर्यंत हितचिंतकांनी सोयीस्कर पोहचवल्याचे समजते. यातून वरिष्ठ नेत्यांचा स्थानिक नेत्यांवरील रोष वाढल्याचे बोलले जाते. असे असताना दक्षिणेतील नगर, पारनेर व अन्य पंचायत समितीत सेनेची सत्ता मिळवून दिल्याकडे आता श्रेष्ठींकडून दुर्लक्ष केले जात आहे. दक्षिणेतील कार्यकारीणी बरखास्त करून नवीन जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी दिले जाण्याच्या मातोश्रीतून हालचाली आहे. कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डीची जबाबदारी पुन्हा राजेंद्र दळवींना दिली जाऊ शकते. तर नगर, पारनेर, श्रीगोंदा मतदार संघासाठी सक्षम नावाच्या शोध सुरू आहे. तसेच उत्तरेतही काही प्रमुख नेत्यांनी विधानसभेला निष्ठा दाखवली नाही, असे आरोप होत आहे. गेल्या आठवड्यापूर्वीच उत्तरेतून काही लोकांना मातोश्रीवर बोलावून घेत याबाबत माहिती घेतल्याचे समजले. यात जिल्हा प्रमुखासह संघटनात्मक बदलाची चर्चा झाल्याचेही सांगितले जाते. याची कुणकुण लागल्याने शिवसैनिक अस्वस्थ आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मला पाच वर्षापूर्वीच विधानसभेचा शब्द दिला होता. पारनेरची जागा शिवसेनेला घ्यावी, अशी शिवसैनिकांची भावना होती. मात्र एकाच घरात दोन उमेदवार्या देऊन ती जागा सोडून दिली. गाडेंसाठी नगरची जागा तरी घ्यावी, अशी अपेक्षा होती. मात्र तीही सोडून जिथे ताकदच नाही, ती श्रीगोंदा घेतली. पराभवानंतरही पक्ष नेतृत्वाकडून चिंतन झाले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद कमी पडला. त्यामुळे मशाल सोडून पुन्हा धनुष्यबाण हाती घेतल्याचे शिवसेनेचे नेते संदेश कार्ले यांनी सांगितले.
काँग़्रेसमधून शिवसेनेत आलेल्या किरण काळेंच्या प्रवेशावरूनही नाराजीनाट्य पहायला मिळाले. काळेंना प्रवेश देऊ नका म्हणून शहरातील एक गट मातोश्रीवर तळ ठोकून होता. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांचे ऐकले नाही. काळेंना नुसता प्रवेश दिला नाही, तर योगीराज गाडे, विक्रम राठोड यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना डावलून काळेंनाच शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही दिली. ही स्थानिक नेत्यांना चपराक असल्याचे बोलले जाते.