

Unseasonal Rain:
पाथर्डी तालुका: तालुक्याला रविवारी (दि. 11 मे) आणि सोमवारी (दि. 12 मे) सलग दोन दिवस वादळी वार्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू झाला, तर चार घरांची पडझड झाली.
दैत्यनांदूर येथे एक व सोनोशी येथे तीन घरांची पडझड झाली. तीनखडी येथे एका बैलाचा, तर माणिकदौंडी येथे एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. पाथर्डी शहरातील लोणार गल्ली येथे वीज कोसळली; मात्र हानी झाली नाही. या दरम्यान सोमवारी कोरडगाव, जिरेवाडी, दैत्यनांदूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला.
कोरडगावहून बोधेगावकडे जाणार्या नदीवरील पुलाखालून सोमवारी जोरदार पाणी वाहत होते. दैत्य नांदूर येथील शिवाच्या आंब्याच्या नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहू लागले आणि वाहतूक एक तास ठप्प झाली होती.
दरम्यान, या पावसामुळे ज्वारी, गहू, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. आंबा, डाळिंब यासारख्या फळपिकांची फळे गळून पडली असून, चारा भिजून खराब झाला. विजेचा पुरवठा खंडित झाला. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोरडगाव, निपाणी जळगाव, कोळसांगवी, मुखेकरवाडी, भुतेटाकळी परिसरात जोरदार वादळी वार्यासह ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने कोरडगाव येथील आसनाच्या नदीला पूर आला. अचानक आलेल्या या पावसामुळे कांदा आणि आंबा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वादळी वार्यांमुळे कांद्याचे सुकवून ठेवलेले पीक पावसात भिजल्याने शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकरी पावसातच शेतात जाऊन कांदा झाकण्यासाठी धावपळ करताना दिसले. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
वादळी वार्यांमुळे अनेक भागांतील विद्युत वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना सिंचन आणि पिकांच्या देखभालीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक कर्मचार्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, शेतकर्यांनी झालेल्या नुकसानीबद्दल आ. मोनिका राजळे यांना कळवले असता त्यांनी कृषी अधिकार्यांशी संपर्क साधून तातडीने शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या.