सावेडी : घराघरांत चैतन्य घेऊन येणारा प्रकाशोत्सव म्हणजेच दिवाळीचा सण आजपासून (वसुबारस) सुरू होत आहे. त्यानिमित्त नव्या कपड्यांसह विविध गृहोपयोगी वस्तू आणि अन्य खरेदीसाठी नगरकरांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. शहरात सर्वत्र उत्साह दिसत आहे. (Latest Ahilyanagar News)
उद्यापासून (दि. 17) अश्विन वैद्य द्वादशी तथा वसुबारस गोमातेची पूजा करून दिवाळीची सुरुवात होत आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची शहरासह उपनगरात दुकाने थाटली आहेत.
वर्षातील सर्वांत मोठा सण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या दीपावलीच्या पर्वातील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. मंगळवारी (दि 21) असलेल्या लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची शहरातील कापड बाजार, नवी पेठ, गंज बाजार, मोची गल्ली, गांधी मैदान, चौपाटी कारंजा, चितळे रोड, टिळक रोड, स्वस्तिक चौक, तसेच सावेडीतील पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, झोपडी कँटीन, या मुख्य रस्त्यांवर विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. या दुकानांत नवी केरसुणी 20 ते 120 रुपये, बांबूच्या काड्याची टोपली 50 रुपये, नारळ 20 रुपये, प्रसाद म्हणून वापरण्यात येणाऱ्या लाह्या-बत्ताशे 20 रुपये, लक्ष्मी 100 ते 500 रुपये, बोळके 50 ते 70 रुपये, (प्रति 5 नग), पणती 30 ते 50 रुपये डझन, प्रसाद 20 रुपये, रांगोळी 10 रुपये किलो अशा दराने साहित्य विक्री केली जात आहे.
लक्ष्मीपूजनाला सिंधीच्या झाडापासून बनवलेल्या झाडणीची पूजा करण्याची परंपरा असल्याने झाडणीची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली आहेत. 80 ते 150 रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे.
दरम्यान, दिवाळीनिमित्त कायनेटिक चौक रेल्वेपुलाशेजारी, शिवाजीनगर, शिवाजीनगर, कल्याण रोड तसेच सावेडीतील प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, सावेडी बसस्थानक, या ठिकाणी फटाक्यांची दुकाने सजली आहेत. सुरसुरी, फुलबाजे, नागगोळी, भुईचक्र, पोंगो, भुईनळे, तसेच लहान मुलांसाठी बनवण्यात आलेले फटाके खरेदीबरोबरच सणासुदीच्या इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे साहित्य विक्रेते संतोष सुकटकर यांनी सांगितले.