नगर : दिवाळीच्या निमित्ताने रविवार असल्याने अहिल्यानगरसह जिल्हाभरातील मोठ्या शहरांमध्ये काल कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीने बाजारपेठा हाऊसफुल्ल झाल्या होत्या. अहिल्यानगर आणि सावेडीतील उपनगरांसह श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, नेवासा, पाथर्डी अशा मोठ्या शहरांतील बाजारपेठांमध्ये रेडिमेड कपडे, फटाके, रेडिमेड फराळ, विद्युत रोषणाईसाठी आवश्यक उपकरणे व वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. सोने-चांदी, तसेच वाहन खरेदीसाठीही गर्दी दिसली. विशेष म्हणजे रविवार असूनही विविध वाहनांची दालने खुली होती. बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.(Latest Ahilyanagar News)
शासकीय, निमशासकीय तसेच औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणाच्या सुट्या शनिवारपासून सुरू झाल्या. औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना झालेला बोनस आणि शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ साडेबारा हजार रुपयांची उचल मिळालेली आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या खरेदीसाठी रविवारी नगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या. कापड बाजार तसेच उपनगरातील कापड दुकानांत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. विविध प्रकारचे रेडिमेड कपडे खरेदीकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून आला.
शहरातील विविध भागांत रेडिमेड गोड, तिखट फराळांचे दुकाने विविध पदार्थांनी थाटले गेले. बहुतांश नागरिकांनी रेडिमेड फराळ खरेदीला पसंती दिल्यामुळे शहरातील मिठाई दुकानांभोवती मोठी गर्दी झाली होती. दिवाळी म्हटले की विद्युत दिव्यांचा झगमगाट. घर, बंगला, अपार्टमेंट आदींवर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे विद्युत रोषणाईसाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदीसाठी दुकानांतदेखील गर्दी होती. नव्याने आलेली विद्युत उपकरणे तसेच दिव्यांच्या माळा खरेदीला मोठी पसंती होती. बाजारपेठेत रंगीबेरंगी तसेच विविध आकारचे आकर्षक आकाशकंदिल ठिकठिकाणी दिसत होते. ते खरेदीसाठी देखील युवकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील शहर आणि उपनगरातील बाजारपेठीत गर्दी केली होती. फराळासाठी आवश्यक असणारे किराणा सामानांची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली.
सोमवारी नरक चतुर्दशी, मंगळवारी लक्ष्मीपूजन आणि बुधवारी दिवाळी पाडवा असल्यामुळे खरेदीसाठी वेळ मिळणार नसल्यामुळे नागरिकांनी रविवारी (दि.19) बाजारपेठ गाठली. कपडे, फराळ आणि इतर आवश्यक ते साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत झुंबड उडाली होती. दिवाळीत आतषबाजी करण्यासाठी फटाके खरेदीसाठी आबालवृद्धांची ठिकठिकाणी थाटलेल्या फटाका दुकानांभोवती गर्दी होती.