कर्जतच्या सर्व नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार? गटनेतेपदाचा वाद पुन्हा न्यायालयात  FIle Photo
अहिल्यानगर

कर्जतच्या सर्व नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार? गटनेतेपदाचा वाद पुन्हा न्यायालयात

10 जूनला होणार सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत नगराध्यक्ष निवडीपूर्वी गटनेता बदलण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळला, नंतर न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सुनावणी घेतली खरी; पण पुन्हा तो प्रस्ताव फेटाळण्यानंतर आता हावाद पुन्हा न्यायालयात गेला आहे.

त्याबाबत न्यायालयाने मंगळवारी (दि. 13) जिल्हाधिकार्‍यांनाच कारणे दाखवा नोटीस देत याबाबत पुढील सुनावणी 10 जून रोजी ठेवल्याचे याचिकाकर्ते अमृत काळदाते यांनी सांगितले. दरम्यान, या नव्या याचिकेमुळे कर्जतच्या सर्व नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात असल्याने न्यायालयातील पुढील सुनावणीकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे. (Latest Ahilyanagar News)

कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांना पदावरून दूर करण्यासाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नगराध्यक्षपदाची निवडणूक होण्यापूर्वी गटनेता बदलण्याचा प्रस्ताव आमदार रोहित पवार यांच्या गटाने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता. परंतु जिल्हाधिकार्‍यांनी तो राजकीय दबावाखाली फेटाळल्याचा आरोप झाला आणि त्या निर्णयाविरोधात आमदार पवार गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना याबाबत फेरसुनावणी घेऊन गुणवत्तेनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी 9 मे रोजी पुन्हा सुनावणी घेतली. मात्र या वेळीही त्यांनी अमृत काळदाते यांचा गटनेता बदलाचा प्रस्ताव फेटाळला.

याबाबत सर्व उपस्थित गटाच्या सह्यांचे नमुना हस्ताक्षर तज्ज्ञांकडून पडताळण्याची विनंती केली होती, असे सांगत ‘जिल्हाधिकार्‍यांनी हा निर्णयदेखील दबावाखालीच घेतला,‘ असा आरोप अमृत काळदाते यांनी केला आणि त्याविरोधात पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

काळदाते यांनी केलेल्या नव्या याचिकेवर मंगळवारी (दि. 13) सुनावणी घेत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व सर्व प्रतिवादी नगरसेवकांना नोटीस काढण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 10 जूनला ठेवल्याचे काळदाते यांनी सांगितले. दरम्यान, या याचिकेवर निर्णय होईपर्यंत या संदर्भाने करण्यात आलेली कोणतीही कार्यवाही आणि कृती या याचिकेवरील निर्णयाच्या अधीन असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही काळदाते यांनी सांगितले.

दरम्यान, नगराध्यक्षांची निवडणूक झाली असली तरी अद्याप उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बाकी आहे. त्यामुळे काळदाते सर्व सदस्यांना व्हीप बजावण्याची शक्यता असून, कोणत्या गटनेत्याचा व्हीप पाळावा, याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी भविष्यात गटातील सर्वच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काळदाते म्हणाले, की सत्तेचा गैरवापर कोणाकडून होऊ नये म्हणून न्यायालयामध्ये दाद मागावी लागली आहे आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल.

याबाबत प्रतिक्रिया देताना गटनेते संतोष मेहत्रे म्हणाले, की ज्यांच्याकडे आता बहुमत शिल्लक राहिलेले नाही ते विनाकारण वेगवेगळ्या पद्धतीने वेळकाढूपणा करत आहेत. खोटी कागदपत्रे सादर करत आहेत. परंतु अखेर विजय सत्याचा आणि बहुमताचाच होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT