

शिर्डी : शहरातील सराफ व्यापार्यांना सोने देण्यासाठी आलेल्या गुजरातमधील व्यापार्याचे सव्वातीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करून त्याचाच मोटारचालक पसार झाला. मंगळवारची (दि. 13) रात्री ते बुधवारीच्या (दि. 14) मध्यरात्रीपर्यंतच्या काळात ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी ः विजयसिंह वसनानी खिशी (वय 35, रा. अहवाल घुमटी, ता. आमिर गड, जि. बनासकांटा, गुजरात) हे सराफ व्यापारी सोन्याचे दागिने येथील व्यापार्यांना देण्यासाठी आपल्या अन्य सहकार्यांसोबत मोटारीतून शिर्डीत आले होते. परिसरातील सराफ व्यापार्यांना दागदागिन्यांचे वितरण करून, ते येथील आंध्रा गल्लीतील हॉटेल सुनीतामधील रूम नंबर 201मध्ये मुक्कामी थांबले होते.
दरम्यान, त्यांच्या वाहनाचा चालक सुरेशकुमार भूरसिंह राजपुरोहित (रा. चोटन बारमेर, राजस्थान) बॅगेत ठेवलेले साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने व रोख चार लाख रुपये आणि काही चेक घेऊन पसार झाला. त्यात अंदाजे तीन कोटी 26 लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे विजयसिंह यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे, पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे, सहायक निरीक्षक निवांत जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांचे पथक रवाना झाले असून, त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पाच महिन्यांपासून होता चालक
दरम्यान, दागिने लंपास करणारा आरोपी आपल्या वाहनावर चालक म्हणून पाच महिन्यांपासून कामाला होता, असे व्यापारी विजयसिंह यांनी सांगितले.