Shevgaon School Teacher Sleeping Pudhari
अहिल्यानगर

Shevgaon School Teacher Sleeping: शाळेच्या वेळेतच शिक्षक झोपेत! शेवगाव तालुक्यातील ढोरसडे प्राथमिक शाळेतील प्रकाराने खळबळ

पालकांमध्ये संताप; शिक्षण विभागाकडून शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस, खुलासा समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

शेवगाव: शिक्षणाच्या मंदिरात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांकडूनच कर्तव्यात कसूर होत असल्याचा संतापजनक प्रकार शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथील प्राथमिक शाळेत समोर आला आहे. शाळा सुरू असताना शिक्षक झोपेत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

जिल्हा परिषद शाळांमधून ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. मात्र, अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शैक्षणिक वातावरण याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. परिणामी अनेक पालक आपल्या पाल्यांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यास प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी शिक्षक आणि शिक्षण विभागाची असताना शाळेच्या वेळेतच शिक्षक झोपेत असल्याचा प्रकार घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

शाळेच्या वेळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे आणि शिस्तीचे वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षकांच्या अशा कथित निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, या प्रकारावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि तालुका शिक्षण विभागप्रभावी भूमिका घेत नसल्याचा आरोपही पालकांकडून केला जात आहे. शाळेतील शिक्षकांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असेल, तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी कोण देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकाराची गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष शाळेला भेट द्यावी, वस्तुस्थितीची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या संबंधित शिक्षकांवर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी. प्रसंगी निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस!

महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ नुसार संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT