Dhiraj Pardeshi Murder Case Pudhari
अहिल्यानगर

Dhiraj Pardeshi Murder Case: कर्तव्यावर जीव गमावलेल्या धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला मदतीची मागणी; पत्नीला शासकीय नोकरी देण्याची मागणी

महापालिका कर्मचारी युनियनची श्रद्धांजली सभेत मागणी; मुकुंदनगरमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे आयुक्तांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी याचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. त्यामुळे कामगार कायद्यानुसार त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी आणि त्याच्या शासन व महापालिकेने सहनभुतीपूर्वक विचार करून त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी आज महापालिकेमध्ये झालेल्या श्रद्धांजली सभेत कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांची मुकुंदनगर परिसरात कर्तव्य बजावित असताना जमावाने हत्या केली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे कामकाज बंद होते. तर, मुकुंदनगर परिसरात सेवा देण्यास कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. महापालिका कर्मचारी युनियनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध करीत धीरज परदेशी यांच्यासाठी श्रद्धांजली सभा घेतली. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसार, सेक्रेटरी आनंदराव वायकर, राहुल साबळे, विजय कोतकर, सोनू चौधरी, सतीश ताठे, विकास गीते, राजू लयचेट्टी, बाळासाहेब विधाते, अनंत लोखंडे आदींसह मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रद्धांजली सभेत कर्मचाऱ्यांनी घटनेचा तीव्र निषेध करीत मयत कंत्राटी कामगार यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची मागणी केली. धीरज परदेशी यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने कामगार कायद्यानुसार त्यांना संबंधित ठेकेदार संस्था व महापालिकेने जबाबदारी स्वाकारून आर्थिक मदत करावी. कारण त्याचे वय अवघे 24 वर्षांचे होते तो आणखी किमान 35 ते 40 वर्षे सेवा करू शकला असात याचा सारसार विचार करून मदत करावी.

तसेच, त्याच्या कुटुंबातील तो कर्ता पुरूष होता. त्याचा शासनाने व महापालिकेने सहनभुतीपूर्वक विचार करून त्याच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावे. धीरजच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आणखी कोणी आरोपी असल्यास पोलिसांनी तत्काळ अटक करावी आणि फकीरवाडा, मुकुंदनगर परिसरातील पोलिस चौकी चोवीस तास उघडी ठेवावी, अशी मागणी मनपा कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.

कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन स्थगित

महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या खुनप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, खटला जलदगती न्यायालयात लावून, विशेष सरकारी वकिलांची नेमनूक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी युनियनकडून पुकारण्यात आलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. तसेच, मुकुंदनगरमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वरंक्षणाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन सेवा देणार

महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचा कर्तव्यावर असताना खून झाला. त्यानंतर महापालिका कर्मचारी युनियनने मुकुंदनगरमध्ये सेवा न देण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु, कायद्यानुसार कोणत्याही भागाची सेवा बंद करता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची काळजी घेऊन सेवा पुरवितण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT