नगर: पथदिवे दुरूस्तीसाठी मुकुंदनगरात गेलेले महापालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांचा छत्रपती संभाजीनगरहून मृतदेह घेवून येणारी रुग्णवाहिका थांबवत संतप्त हिंदुत्ववादी संघटना, कार्यकर्त्यांनी डीएसपी चौकात रस्ता रोखला. तीन तासानंतरही तोडगा न निघाल्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मृत धीरजच्या न्यायासाठी कायदेशीर प्रक्रियेत सरकार कोठेही कमी पडणार नाही. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करत अशा प्रवृत्तीस ठेचून काढू, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर धीरज यांच्यावर नालेगावच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुकुंदनगरात शुक्रवारी धीरज परदेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी धीरज यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदनासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. इन कॅमेरा शवविच्छेदन केल्यानतंर सोमवारी सायंकाळी मृतदेह नगरमध्ये आणण्यात आला. त्यापूर्वीच मृतदेह घेवून येणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मार्गावर डीएसपी चौकात आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, आमदार गोपिंचद पडळकर आणि हभप संग्रामबापू भंडारे यांच्या नेतृत्वात परदेशी कुटुंबासह हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा झाले. सूत्रधाराला शोधून काढा अशी घोषणाबाजी सुरू असतानाच काही आंदोलकांनी वाहने अडविल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, महापालिकेचे श्याम गोडळकर यांनी प्रशासनाची बाजू मांडत आंदोलकांची समजूत काढली, पण ती फेटाळून लावण्यात आली. अखेर आ. पडळकर यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या आश्वासनानंतर समाधान झाल्याने तीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर नालेगावातील अमरधाममध्ये धीरज परदेशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..!
आमदार गोपिचंद पडळकर यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला. मृत धीरज परदेशी यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. कायदेशीर प्रक्रियेमध्ये कोठेही कमतरता राहणार नाही. खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी सरकार न्यायालयास विनंती करेल. आरोपींच्या अतिक्रमित घराबाबत चौकशी करून कारवाई करू आणि खटल्यासाठी विषेश सरकारी वकिलाची नेमणूक करू. ही घटना अत्यंत निंदनीय असून, अशा प्रवृत्तींना सरकार ठेचून काढेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आरोपींना आठ दिवस कोठडी
परदेशी खूनप्रकरणातील आरोपी मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद आणि वसीम रहिम सय्यद यांना न्यायालयाने आठ दिवसांची (दि. १८ पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपींना पळून जाण्यासाठी नेमकी कोणी व कशी मदत केली, यासह विविध मुद्द्यांवर तपासासाठी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली.
आरोपींच्या घराला नोटीस
नागरदेवळे ग्रामपंचायतीने मुकुंदनगरमधील आरोपीच्या घरावर नोटीस चिटकली आहे. ते घर अतिक्रमीत असल्याचे त्यात लिहिले आहे. २४९४ व २५१७ मध्ये ओपन स्पेसवर विनापरवानगी व अनधिकृतपणे बांधकाम केल्याची नोटीस सय्यद याकुबमियॉ सय्यद मिरा पटेल (रा. आलमगीर, नागरदेवळे) यांना बजावली. काही पुराव्या असल्यास ते सादर करण्याचे त्यात म्हटले आहे. म्हणणे मांडले नाही, तर 'आपले काहीही म्हणणे नाही' असे गृहीत धरून ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमित बांधकाम काढण्याची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. ग्रामपंचायत अधिकारी शैलाजा राऊत व प्रशासक (ग्रामपंचायत नागरदेवळे) यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस बजावली.
महापालिका ठप्प; आयुक्तांनीच उघडले कुलूप
धीरज परदेशी यांच्या मृत्युनंतर महापालिका कर्मचारी युनियनने सोमवारी कामकाज बंद ठेवल्याने महापालिका ठप्प झाली होती. कर्मचारी संपावर असल्याने खुद्द आयुक्त यशवंत डांगे यांच्यावर सकाळी स्वतः प्रवेशद्वार उघडण्याची वेळ आली.
जीव धोक्यात घालून शहरातील नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरविण्याचे काम कर्मचारी करतात. कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील, तर नागरिकांना सेवा कशा द्यायच्या, असा सवाल कामगार संघटनेने उपस्थित केला.
मुकुंदनगर परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षणाची हमी मिळाल्याशिवाय नागरी सुविधा पुरविण्यासाठी कर्मचारी पाठविले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका युनियनने घेतली. महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, चार प्रभाग समिती कार्यालय बंद ठेवण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.