नगर: धीरज परदेशी खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी आज अटक केली. आता आरोपींची संख्या तेरा झाली असून, दहा आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींनी कट रचूनच धीरज परदेशीचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिस कट रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेत आहेत.
मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, अक्रम याकूब सय्यद, वसिम रहीम सय्यद, इम्रान मुसा सय्यद, जाहीद नुसरत शेख यांना यापूर्वी अटक केलेली आहे. आज पोलिसांनी आरमान लियाकत सय्यद, हुजैफ साजिद शेख, मोहमंद रशाद इम्रान सय्यद (तिघे रा. मुकुंदनगर) यांना अटक केली. अबजीमिया याकूब सय्यद, राहील शेख (रा. मुकुंदनगर) दोघे पसार आहेत.
दि. ७ ऑगस्ट रोजी आरोपी सिराज सय्यद, मेहराज सय्यद, मुस्तकीम सय्यद, अबजीमिया सय्यद यांना धीरज परदेशी मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मित्र आरमान सय्यद, जाहीद सय्यद, हुजैफ सय्यद, राहील शेख, मोहम्मद सय्यद (रा. मुकुंदनगर) यांना बोलावून घेतले. त्यांनी धीरजला कसे मारायचे याचा कट रचला. त्यानंतर सिराज व मेहराज यांनी रिक्षातील कोयता घेतला. त्यानंतर दर्गा दायरा कब्रस्तान येथे गेले असता धीरज परदेशी एकटाच उभा होता. आरोपींनी तेथील बांधकामाच्या बल्ल्या घेऊन धीरजला बेदम मारहाण केली. तो खाली पडल्यानंतर आरोपी पळून गेले, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्यात तेरा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यातील दोन आरोपी अद्याप पसार आहेत. दरम्यान, पोलिसांनी आज आणखी तीन आरोपींना अटक केली. आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पहिले सात व आज हजर केलेले तीन अशा दहा जणांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात करीत आहेत.
आरोपींनी खुनाचा कट कसा रचला, कटाचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावयाचा आहे. तसेच, आरोपींच्या मोबाईलमध्ये काही माहिती असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करावयाची आहे. गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी पसार असून, त्यांच्या अटकेसाठी आरोपींकडे तपास करावयाचा आहे, त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली होती.
गुन्ह्यातील सात वाहने जप्त
भिंगार पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत सहा वाहने जप्त केली आहेत. आरोपी इम्रान सय्यद यांची मोपेड दुचाकी, आरोपी मुस्तकीम सय्यद यांची दुचाकी, आरोपी मेहराज सय्यद यांची ॲपेरिक्षा, आरोपी अक्रम सय्यद यांची ॲपरिक्षा, वसीम सय्यद यांची मोटारकार, आरोपी जाहीद शेख याची मोपेड दुचाकीचा समावेश आहे.