Dam  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Dam Water Storage: जिल्ह्यात धरणांमध्ये 46 टक्के पाणीसाठा; पावसाळा लांबल्यास पाणी कपातीचे संकट

गेल्या वर्षीपेक्षा अधिक साठा असला तरी पावसाने दडी मारल्यास पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नगर: पावसाळा सुरु होण्यास आणखी एक महिन्याचा अवधी बाकी असताना 46 टक्के म्हणजे 23 हजार 434 दलघफू इतका पाणीसाठा धरणांत शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पाच टीएमसी अधिकचा साठा असला तरी यंदा पावसाळा लांबल्यास पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो पाणीयोजनांवर पाणी कपातीची वेळ येण्याची शक्यता आहे.

गेल्या पावसाळ्यात पहिले दोन महिने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पावसाने हजेरी लावली. मात्र, लाभक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्येच लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जोरदार हजेरी लावत पावसाने सरासरी ओलांडली होती. जाता जाता पडलेल्या जोरदार पावसाने भूजलपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे विहिरी,कूपनलिका आदींना पाणीच पाणी असल्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम जोमात होता.

मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा आदी धरणांतून रब्बी पिके आणि बिगर सिंचनासाठी जवळपास 54 टक्के आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे आजमितीस 6 मे 2026 रोजी जिल्हाभरातील नऊ लहान- मोठ्या धरणांत 45.86 टक्के म्हणजे 23 हजार 434.55 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 18 हजार 625.48 दलघफू इतका म्हणजे 36.45 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठ्याची नोंद असली तरी यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या पावसाने पहिले दोन महिने दडी मारल्यास धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीयोजनांना पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पाणीसाठा दलघफू (टक्केवारी)

भंडारदरा :4628(42), निळवंडे: 3808 (46), मुळा :12692 (49), आढळा: 558 (52), मांडओहळ: 77.25(19.36), घाटशिळ पारगाव: 164(37.53), सीना:1149 (48), खैरी: 201.47 (38), विसापूर: 156.83 (17.33)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT