आश्वी : गावाकडील जत्रा किंवा सप्ताह म्हटले की, उत्साह ओसंडून वाहत असतो. मात्र, याच काळात नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या तरुणांची गावाबद्दलची ओढ आणि सामाजिक भान जेव्हा एकत्र येते, तेव्हा एक आदर्श उपक्रम उभा राहतो. संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे नुकत्याच पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात याचा प्रत्यय आला. नोकरीसाठी बाहेरगावी असणाऱ्या 35 तरुणांनी एकत्र येत 61 हजार रुपयांची वर्गणी जमा केली आणि महाप्रसादासाठी आलेल्या तब्बल 30 हजार भाविकांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म केले.
दाढ खुर्द येथे ब्रम्हालिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. सप्ताहाच्या समाप्ती दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अशा वेळी हजारो भाविक एकत्र येतात तेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गर्दी होते, अनेकदा पाणी मिळवण्यासाठी भाविकांची धावपळ होते आणि नियोजनाचा अभाव दिसून येतो. हीच बाब ओळखून गावातील बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या सुपुत्रांनी पुढाकार घेतला.
नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या सुमारे 35 ते 37 तरुणांनी व्हॉट्सअप आणि फोनद्वारे संपर्क साधत या सप्ताहात काहीतरी वेगळे योगदान देण्याचे ठरवले. बघता बघता 61 हजार रुपयांची रक्कम जमा झाली. या रक्कमेतून त्यांनी महाप्रसादाच्या दिवशी उपस्थित राहिलेल्या 30 हजार भाविकांसाठी पाण्याच्या सीलबंद बॉटल्स उपलब्ध करून दिल्या. पंगतीमध्ये बसलेल्या प्रत्येक भाविकाला जागेवरच पाण्याची बॉटल मिळाल्याने पाण्यासाठी होणारी धावपळ टळली आणि शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद पार पडला. या तरुणांच्या सामाजिक बांधीलकीचे आणि कल्पक नियोजनाचे दाढ खुर्द ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांकडून कौतुक होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे युवक पुढील प्रमाणे चेतन जोशी, विठ्ठल जोशी, विकास जोशी, एकनाथ नाईकवाडी, प्रभाकर जोरी, पर्वत गंगाधर, संदीप झनान, अमोल बोऱ्हाडे, ज्ञानेश्वर जोरी, अशोक जोशी, नवनाथ जोशी, कैलास जोशी, दादासाहेब जोशी, भाऊसाहेब जोशी, दिनकर जोरी, राधाकृष्ण जोशी आदी युवकांनी योगदान दिले.