नगर : जिल्ह्यातील रब्बी पिके जोमात असून, पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. बुधवारी (दि.18) झालेल्या अवकाळी पावसाने नगर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, अकोले व राहाता या सहा तालुक्यांतील 41 गावांतील 3 हजार 559 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. याचा फटका 7 हजार 352 शेतकऱ्यांना बसला आहे. राहुरी तालुक्यात सर्वाधिक 2 हजार 81 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गहू, हरबरा, ज्वारी व मका, कांदा, भुईमूग, टोमॅटो, चारापिके तसेच संत्रा, आंबा, डाळिंब, टरबूज आदी फळपिकांची चांगलीच वाढ झालेली आहे. गहू, ज्वारी, हरबरा आणि पिके काढणीला आलेली आहेत. काही ठिकाणी काढणी सुरू असतानाच बुधवारी (दि.18) अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर दोन तीन ठिकाणी गाराचा पावसाची नोंद झाली. त्यामुळे रब्बी पिकांबरोबरच फळपिकांना देखील काही प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका आंब्याचा मोहर व फळांना फटका बसला आहे.
बुधवारी (दि.19) झालेल्या पावसाने नेवासा तालुक्यातील 17, राहुरीतील 8, अकोले 6, अहिल्यानगर 5, पाथर्डी 2 आणि राहाता तालुक्यातील 3 गावांतील फळे आणि रब्बी पिकांना फटका बसला आहे.
नेवासा तालुक्यात पावसाने गव्हाचे, राहुरी तालुक्यात गहू, कांदा, मका, भाजीपाला, अहिल्यानगर तालुक्यात गहू, कांदा, भुईमूग, हरभरा, आंबा, डाळिंब व संत्रा आदी फळांचे नुकसान झाले. अकोले तालुक्यात पावसाने गहू, कांदा व टोमॅटो, राहाता तालुक्यात गहू आणि द्राक्षांचे नुकसान झाले. पाथर्डीत गहू, बाजरी, मका आणि हरबरा पिकांचे नुकसान झाले आहे.
सहा तालुक्यात सरासरी 3 हजार 558.5 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यापैकी 3 हजार 203.5 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे.
नगर : 930 (1445)
पाथर्डी : 41 (160)
राहुरी : 2081 (5015)
नेवासा : 452 (513)
अकोले : 38 (194)
राहाता : 16.5 (25)
पारनेर ः तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटात पाऊस व गारपीट झाली. त्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. वडगाव सावताळ व पळशी भागात बुधवारी पावसामुळे वाटाणा, टोमॅटो, कांदा या पिकांचे नुकसान झाले. गुरुवारी भनगडेवाडी, वाघवाडी, ढवळपुरी, निघोज, जामगाव, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर अशा भागात वादळी वाऱ्यासह काही प्रमाणात गारपीट व पाऊस झाला. त्यात शेतातील टरबूज व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
संगमनेर तालुक्यात गारपीट
संगमनेर ः शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले.
पठार भागात साकूरसह बिरेवाडी, हिवरगाव पठार, जांभुळवाडी, रणखांब, मांडवे बुद्रुक, शिंदोडी, जांबुत बुद्रुक व खुर्द, कौठे मलकापूर, दरेवाडी, खंडेरायवाडीसह आसपासच्या गावांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जांबुत परिसरात गारपीट झाली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेल्या गव्हासारख्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
श्रीरामपूर ः पुढारी वृत्तसेवा
श्रीरामपूर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या गहु, मका, टरबुज या पिकांना मोठा फटका बसला आहे.
हार्वेस्टिंग मशिनच्या वेंटींग लिस्टमुळे 50 टक्के गहू काढणीवीना मागे राहिलेला असताना बुधवार दि.18 रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसाला सुरवात झाली. खानापूर, कमालपूर, घुमनदेव, भामाठाणसह माळवाडगाव, मुठेवाडगाव, टाकळीभानसह परिसरात तर पुर्वेकडील कारवाडी, बेलपिंपळगाव परीसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार प्रहार केला. काढणीस आलेली गव्हाची पिके त्यामुळे भुईसपाट झाली. काही प्रमाणात गारांचा वर्षाव झाल्याने टरबुज व मका पिकांची पाने गळुन पडली. शेतात पाणी साचल्याने टरबुज फळ चिखलात रुतले.
कांदा पिकालाही अवकाळीचा चांगलाच फटका बसला. आधीच बाजार भावाची घरघर त्यातच अवकाळीची भर पडल्याने होणारे नुकसान पानावल्या डोळ्यांनी शेतकरी पहात होता. आवकाळीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे संबधीत विभागाने नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी करुन शासनाने आर्थिक नुकसान भरपाई तत्काळ द्यावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्यांकडुन केली जात आहे.