अतिवृष्टी-पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. आशिया Pudhari
अहिल्यानगर

Flood damage panchanama Ahilyanagar: अतिवृष्टी-पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. आशिया

27-28 सप्टेंबरसाठी यलो अलर्ट; अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश, संपर्क, वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्ह्याला 27 व 28 सप्टेंबरला ‌‘यलो अलर्ट‌’ जारी करण्यात आला असून, या आपत्तीच्या काळात मुख्यालय सोडू नये, असा इशारा देखील त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. (Latest Ahilyanagar News)

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या आढाव्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

संपर्क तुटलेल्या गावांचा संपर्क लवकरात लवकर सुधारावा. आपत्तीच्या काळात गावांमधील वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या गावठाण फीडर तातडीने दुरुस्त कराव्यात. तसेच पाणीपुरवठा योजना अखंडित राहील याचीही खात्री करावी.

पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या लाईन्स बाधित झाल्यास त्यांची दुरुस्ती करावी. प्रत्येक गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होईल यासाठी पाण्याचे नमुने तपासणे आवश्यक आहे. तसेच पूर आलेल्या गावांमध्ये स्वच्छता करावी, औषधसाठा पुरेसा ठेवावा व पशुधनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

आपत्तीच्या काळात तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी टीमवर्कने काम करतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी फील्डवर राहतील,अशा सूचनाही त्यानी दिल्या आहेत.

बंधारे, पाझर तलाव आणि पुलांची दुरुस्ती करा

पावसामुळे ज्या भागातील बंधारे व पाझर तलाव नुकसानग्रस्त झाले आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. यासाठी आवश्यक यंत्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. आवश्यकता भासल्यास इतर जिल्ह्यातून किंवा स्वयंसेवी संस्थांकडून उपलब्ध असलेली यंत्रे वापरून काम प्राधान्याने पूर्ण करावे. पूलांचे नुकसान झाले आहे किंवा पुलांचे कठडे तुटले आहेत, ती दुरुस्त करून वाहतुकीला अडथळा येऊ नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT