Rashin chowk name controversy
कर्जत-राशीन: राशीन (ता. कर्जत) येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या चौकामध्ये रविवारी (दि. 13) रात्री अकरा वाजता अचानक भगवा ध्वज लावण्यात आला. यानंतर या चौकामध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने लाठी चार्ज करून जमावाला पांगवले. यानंतर सोमवारी (दि. 14) सकाळी 11 वा. कर्जत तहसील कार्यालयाबाहेर सकल ओबीसी समाज व क्रांतिसूर्य महात्मा फुले फाउंडेशनतर्फे जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी शहरातील महात्मा फुले चौक परिसरामध्ये सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार राशीनमध्ये बैठक घेण्यात येईल आणि तो पर्यंत महात्मा फुले चौक या परिसरामध्ये पोलीस गार्ड नेमणूक करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. (Latest Ahilyanagar News)
या संदर्भात जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासन यांना फाउंडेशनतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राशीन गावात याआधी या ठिकाणाचे नाव करमाळा चौक होते. परंतु 26 जानेवारी 2014 रोजी ग्रामसभेच्या ठरावानुसार या चौकाचे नाव अधिकृतपणे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक असे करण्यात आले. या ठिकाणी दरवर्षी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
रविवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास काही लोकांनी पोलिस बंदोबस्त असतानाही त्या चौकावर भगवा झेंडा फडकावला, फटाके फोडले आणि संभाजी महाराज चौक असा उच्चार करत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ओबीसी समाजाचे म्हणणे आहे की, या चौकाच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी वेळोवेळी अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, आ. रोहित पवार, खा. नीलेश लंके, सभापती प्रा. आ. राम शिंदे, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला होता. सकल ओबीसी समाजातर्फे क्रांतिसूर्य महात्मा फुले फाउंडेशनने दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याची खंतही या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दादागिरी करणार्यांवर आणि दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे. जोपर्यंत योग्य ती कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळीच सोमवारी ठिय्या आंदोलन सुरू केले.
त्यानंतर कर्जत येथील महात्मा फुले चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अधिकार्यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. राशीनमध्ये पोलिस निरीक्षक मोहन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुळीक यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
...तर सर्वप्रथम मराठा समाज विरोध करेल
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच आराध्य दैवत आहेत. यामुळे राशीन येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकाचे नाव बदलण्याचा कोणताही विचार किंवा प्रक्रिया झालेली नाही. चौकामध्ये फक्त जो वारकरी, धारकरी व सर्व समाजाचा भगवा ध्वज आहे तो त्या ठिकाणी उभा करण्यात आला आहे.
या परिसराला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा कोणाचाही हेतू नाही व पुढील काळातही असा कोणताही प्रकार होणार नाही. या चौकाचे नाव क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हेच राहील. जर ते नाव बदलण्याचा कोणी प्रयत्न केला, तर सकल मराठा समाज त्याला सर्वप्रथम विरोध करेल. या प्रकरणी पोलिस प्रशासन व काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी जाणीवपूर्वक अपप्रचार करून दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचे काम केले आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
विनाकारण कोणी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना जशास तसे उत्तरही देण्यात येईल. कर्जत येथील पोलिस निरीक्षकांनी समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचे काम केले आहे. परिस्थिती शांत असताना लाठी चार्ज करून खोटे गुन्हे दाखल केले आहे. याबाबत त्यांच्यावर चौकशी करून कार्यवाही करावी.- वैभव लाळगे व रावसाहेब धांडे, समन्वयक, सकल मराठा समाज